येरवडा । आधार कार्ड योजना सुरू झाल्याने ह्या कार्डच्या नोंदणीसाठी येरवडा क्षेत्रिय कार्यालयात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र क्षेत्रिय कार्यालयात दिसून येत आहे.
येरवडा नगररोड महामार्गावर येरवडा व नगररोड क्षेत्रिय कार्यालय आहे. ह्या दोन क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणार्या अनेक भागातील नागरिक आधार कार्डपासून वंचित राहिले होते. मात्र नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने आधार कार्ड दुरुस्ती उपक्रम प्रशासनाच्या वतीने पुन्हा राबविण्यात येत असल्याने येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी, वडगाव शेरी, खराडी भागातील नागरिकांना याची माहिती मिळताच येरवडा क्षेत्रिय कार्यालय परिसरात आधार कार्ड व दुरुस्तीसाठी नागरिकांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. मात्र नागरिकांना असलेली मुख्य अडचण दूर व्हावी, या उद्देशाने येरवडा प्रभाग समितीच्या अध्यक्षा किरण जठार, नगररोड क्षेत्रिय कार्यालय प्रभाग समिती अध्यक्षा शीतल शिंदे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय लांडगे, उपअधीक्षक संतोष काटेवाल, सविता वावरे यांच्यासह 4 किटवर 6 कर्मचारी यांची टीम तयार करून प्रथम 160 नागरिकांना टोकन देण्यात आले. याबरोबरच प्रत्येक मशीनवर 40 जणांचे टार्गेट देण्यात आल्याने कर्मचार्यांचा कामाचा ताण कमी झाला असून नागरिकांना जास्त त्रास न होता सोप्या पद्धतीने कामकाज कसे सुरळीत होईल, यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असल्याची माहिती उपअधीक्षक संतोष काटेवाल यांनी दिली. तसेच सकाळपासून नागरिकांसह अनेक महिलांनी आधारकार्डसाठी क्षेत्रिय कार्यालयात गर्दी केली होती.