नवी दिल्ली। आधार कार्ड – पॅन कार्ड जोडणीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. आधार कार्ड-पॅन कार्ड जोडणीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले असले तरी, आधार कार्ड बंधनकारक नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, ते पॅनकार्डद्वारे आयकर भरू शकतील. पण ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनी पॅन कार्डशी जोडणी करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. घटनापीठाचा अंतिम निकाल येईपर्यंत आधार-पॅन कार्ड जोडणीच्या निर्णयावरील स्थगिती कायम राहील, असा निर्णयही न्यायालयाने दिला आहे.
गैरव्यवहार रोखण्यासाठी केला होता नियम
आयकर कायद्यातील कलम 139 (एए) नुसार, आयकर विवरण पत्र भरण्यासाठी आधार कार्ड सादर करणे सक्तीचे करण्यात आले होते. बनावट कागपत्रे सादर करून पॅन कार्ड तयार केले जातात. त्या आधारे बोगस कंपन्या स्थापन करून गैरव्यवहार होतात. त्यामुळे ते रोखण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला होता. तसेच आधार आणि पॅनकार्ड जोडण्याची मोहिमही केंद्र सरकारने सुरू केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करणार्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज, महत्त्वाचा निकाल दिला. निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. मात्र, पॅन कार्ड-आधार कार्ड जोडणी बंधनकारक नसल्याचे म्हटले आहे.
आधार कार्ड नसलेल्यांना दिलासा
आधार कार्ड नसला तरी पॅन कार्डद्वारे आयकर भरता येणार आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने आधार कार्ड नसलेल्यांना दिलासा दिला आहे. पण ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनी पॅन कार्ड-आधार कार्डशी जोडावे, असेही सांगितले आहे. तसेच निकाल देताना आयकर कायद्यातील कलम 139 (ए ए) वैध ठरवण्यात आले आहे. ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे, पण आधार कार्ड नाही. तर सरकार त्यांचे पॅनकार्ड रद्द करू शकत नाही. दरम्यान, याआधी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी घेताना निर्णय राखून ठेवला.