‘आधार’चे बस्तान सरकारी जागेत केव्हा?

0

शंभर केंद्रांपैकी आतापर्यंत अवघ्या 39 केंद्रांचे स्थलांतर; खासगी जागेत अतिरिक्त शुल्क आकारणी

पुणे : खासगी जागा आणि ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे सुरू असलेली आधार केंद्रे ही सरकारी जागांमध्ये हलविण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर अद्याप ही केंद्रे सरकारी कार्यालयांमध्ये स्थलांतरित होण्यास तयार नसल्याचे उघड झाले आहे. राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवांकडून आदेश देण्यात आल्यानंतरही सुमारे शंभर केंद्रांपैकी आतापर्यंत अवघ्या 39 आधार केंद्रचालकांनी सरकारी जागेमध्ये केंद्र स्थलांतरित केली आहेत.

खासगी जागा किंवा आपले सरकार सेवा केंद्रांमधील आधार केंद्र ही स्थलांतरित न केल्यास संबंधितांची ’आधार’ची कामे काढून घेण्याची कारवाई केली जाणार आहे. सरकारी जागेत केंद्र स्थलांतरित न करणार्‍यांची नावे ‘महाऑनलाइन’कडून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (यूआयडीएआय) मुंबई कार्यालयाकडे ही नावे देण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधितांची ’आधार’ची कामे काढून घेण्यात येणार आहेत.

माहिती तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या आदेशानुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविणे गरजेचे असल्याचे याबाबत ‘आधार’चे समन्वक सारंग कोडोलकर यांनी सांगितले.

खासगी जागेत असलेल्या आधार केंद्रचालकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर ‘यूआयडीएआय’ने खासगी जागेतील आधार केंद्रे ही सरकारी जागेत स्थलांतरित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने संबंधितांना सूचना दिल्या आहेत. मात्र, शंभरपैकी 39 केंद्रे ही सरकारी जागेत स्थलांतरित झाली आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांची क्षेत्रीय कार्यालये, कँटोन्मेंट बोर्ड, पुणे महापालिकेचे करसंकलन केंद्र, जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालये, नगरपालिका, पंचायत समिती अशा विविध सरकारी कार्यालयांमध्ये ही आधार केंद्रे स्थलांतरित करण्यात येणार आहेत.

आधार यंत्रे जमा न केल्यास कारवाई

दरम्यान, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या काही आधार यंत्रांचा वापर हा आधार नोंदणीसाठी करण्यात येत नाही. ती आधार यंत्रे ही जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावी लागणार आहेत. ती आधार यंत्रे जमा न केल्यास संबंधित केंद्रचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधितांनी आधार यंत्रे जमा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.