यवत । आधार कार्ड आणि ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड घरपोहच देऊ असे सांगून 200 महिलांचे व नागरिकांचे 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दौंड तालुक्यातील बोरीभडक गावाच्या ग्रामपंचायत सदस्या रेवती रणजित पवार यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली आहे.
ओम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (वाठुर जि. बीड) याचे तीन तरुण-तरुणींनी येथील नागरिकांना अल्प दरात आधार कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड घरपोहच काढून देऊ असे सांगून कार्डसाठी प्रत्येकी शंभर रुपये घेऊन असे एकूण दोनशे जणांकडून जमा करून घेतले. उद्या सकाळी मशीन घेऊन येऊन कार्ड काढण्यास सुरुवात करू व सर्वच नागरिकांचे कार्ड घरपोहच करू, उद्या सकाळी 8 वाजता हजर राहायचे असे सांगून निघून गेले ते अद्याप परत आलेले नाहीत.
त्यांनी दिलेल्या पत्यावर व मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता तो चुकीचा असल्याचे आढळून आले. यावरून वरील तीन अज्ञात तरुणांनी महिलांची व नागरिकांची 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याची खात्री झाल्याने आम्ही या अज्ञात तरुणांविरुद्ध तक्रार दाखल करीत आहोत. महिलांची फसवणूक झाल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जाद्वारे केली आहे.
Next Post