आधारभूत केंद्रात शेतकऱ्यांचा माल खरेदी न करता पडून

0

नोंदणी करूनही केंद्राकडून माल खरेदी केला जात नसल्याने शेतकरी संतप्त
शिरपूर – कृउबा शिरपूर येथे राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महामंडळ (नाफेड) कडून आधारभूत खरेदी केंद्रात शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधारभूत किमतीत सोयाबीन, मूग, उडीत खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी ऑनलाईन ७/१२ सक्तीचा केला होता आणि १ ते १० आक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आणि नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी माल केंद्रावर आणला. काही दिवस आधारभूत किमतीत शेतकऱ्यांकडून माल खरेदी केली गेला.परंतु नंतर केंद्रात माल खरेदी करणे बंद केले गेले आहे. जो माल खरेदी केला गेला तो ही आधारभूत किमतीपेक्षा फक्त सोयाबीनला १०० रूपये भाव जास्त दिला गेला आणि मूग, उडीत या मालाला आधारभूत किमतीपेक्षा ही कमी किमतीत खरेदी केला गेला आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांचा माल अजूनही पडून
बऱ्याच शेतकऱ्यांचा माल केंद्रावर खरेदी न करताच पडून असल्याने शेतकरी संतप्त भावना व्यक्त करत आहेत. अजूनही विखरण येथील निंबा तानका निकम, तऱ्हाड कसबे येथील राजेंद्र गंभीर तिरमल, बोरडीचे राजेंद्र भाईदास पाटील, प्रकाश तुकाराम पाटील, मांजरोदचे महेंद्र अशोक पाटील, वाघाडीचे नरहर धोबी, चंदनबाई नथु पाटील, गुरुदत्त शामराव पाटील, रविंद्र गिरीधर पाटील आदी शेतकऱ्यांचा नोंदणी केलेला शेतकऱ्यांचा माल खरेदी केंद्रात पडून आहे. आणि तो खरेदी केला जात नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.