‘आधार’वर आता जीएसटीचा भार

0

पुणे । आधार दुरुस्तीसाठी नागरिकांना वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरावा लागणार आहे. त्यामुळे आधार कार्डमधील दुरुस्तीसाठी पाच रुपयांनी महाग झाली असून नागरिकांना आधार दुरुस्तीसाठी आता 30 रुपये मोजावे लागणार आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक करणे, बँक खाते, मोबाईल क्रमांक, गॅसचे अनुदान आदींसाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. आता सर्वच ठिकाणी रहिवासी पुरावा अथवा जन्मतारखेचा पुरावा यासाठी आधार कार्डची मागणी होते. त्यामुळे आधार नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी होते. त्यातच आधार कार्डमधील पत्त्यांमधील बदल, नावामधील चुका, जन्मतारिख चुकीची असणे त्याचबरोबर जन्मतारखेमध्ये फक्त वर्ष नोंदविणे यामुळेही आधारमधील दुरुस्तीसाठीही नागरिक येत आहेत.

आधार कार्डातील चुकांमुळे अनेकांना त्रास
केंद्र सरकारच्या आदेशानुसार यापूर्वी राज्य सरकारकडून खासगी कंपनींना आधार नोंदणीचे काम देण्यात आले होते. त्यानुसार राज्यभरात आतापर्यंत 90 टक्के आधार नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. तर पुणे जिल्ह्यात 95 टक्के पेक्षा जास्त नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. मात्र ही आधार नोंदणी करताना त्यामध्ये नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. या चुका प्रामुख्याने ज्या कंपनीकडून हे नोंदणीचे काम करण्यात आले, त्या कंपनीने पूर्ण प्रशिक्षित कर्मचारी न नेमल्यामुळे झाल्याचे असल्याचे लक्षात आले आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध कामांसाठी आधार क्रमांक मागितला जात आहे. मात्र आधार कार्डातील चुकांमुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

खासगी ऑपरेटरांना काम
दरम्यान, आधार नोंदणीचे काम ज्या कंपनीला सरकारकडून देण्यात आले होते. त्या कंपनीकडून हे काम काढून घेण्यात आले आहे. आधार नोंदणीचे व दुरुस्तीचे काम आता महाऑनलाईन या संस्थेला देण्यात आले आहे. मात्र महाऑनलाइन केंद्रांची संख्या अपुरी असल्यामुळे आणि सरकारी कार्यालयांमध्ये देखील आधार दुरुस्ती मशिन उपलब्ध होऊ न शकल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर मध्यंतरी खासगी ऑपरेटर यांना देखील आधार कार्डातील दुरुस्तीचे काम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र काही केंद्र चालक नागरिकांकडून दुरुस्ती शुल्काबराबेरच जीएसटी वसूल करीत असल्याचे लक्षात आले होते. त्याबाबत स्पष्टता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे या संदर्भात विचारणा करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने आधार कार्डातील दुरुस्तीवर जीएसटी अकारावा, अशी सूचना दिल्या आहेत.