कल्याण : आधारवाडी कारागृहातून दोन अट्टल दरोडेखोर निसटल्याचे उघड होताच एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर कारागृहच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकाराची कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेत कारागृह निरीक्षक भारत भोसले यांची तडफाफडकी बदली करण्यात आली असून त्यांना येरवडा कारागृहातील ट्रेनिंग सेंटरच्या प्रशिक्षक पदावर धाडण्यात आले आहे. तर भोसले यांच्या जागी ठाणे कारागृहातील डेप्युटी सुप्रीडेट अ.सा.सदाफुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून 23 जुलै रोजी सकाळी चोरी आणि दरोड्याच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या मनीशंकर सेल्वराज नाडर आणि डेव्हिड मुरगेश देवेन्द्रण या दोन कैद्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्याच्या वायरचा दोरखंडासारखा वापर करत 20 ते 25 फूट उंचीच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले. या घटनेनंतर आधारवाडी कारागृहच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. या कैद्यांच्या शोधासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले आहे. कैदी पसार होऊन चार दिवसांचा कालावधी लोटला मात्र अजूनही या दोन कैद्यांना जेरबंद करण्यास पोलिसांना अपयश आले आहे.पोलिसांची विविध पथके या फरार कैद्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान या कैद्यांनी कारागृहातून पलायन करताच त्याच दिवशी पुन्हा आपला चोरी आणि दरोड्याचे सुरु केल्याने पोलिसाची झोप उडाली आहे.
हलगर्जीपणा भोवला
या घटनेनंतर कारागृह महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करत हलगर्जीपणा करणार्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत कारागृह महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करत हलगर्जीपणा करणार्या आरोपीवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आधारवाडी कारागृह अधीक्षक भारत भोसले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून याच्याकडे पुण्यातील येरवडा कारागृहातील ट्रेनिंग सेंटरचे पदभार देण्यात आला आहे तर भोसले यांच्या जागी प्रभारी कारागृह अधीक्षक म्हणून ठाणे कारागृहातील वर्ग 2 चे अधिकारी सदाफुले यांची नेमणूक करण्यात आली आहे. काही वर्षे कल्याण कारागृहात अधिकारी म्हणून काम केले आहे.
कर्मचार्यांना दक्षतेच्या सूचना
कारागृह प्रशासनाने अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या दोन अधिकार्यांच्या पदावर अलिबाग आणि ठाणे कारागृहातून दोन वर्ग 2 चे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्या नंतर सदाफुले यांनी घडलेली घटना गंभीर असून यासारखी घटना भविष्यात पुन्हा घडू नये यासाठी सर्व कर्मचार्यांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्याचे संगितले.
तामीळनाडूतही घरफोडी
मनिशंकर नाडर आणी डेव्हिड देवेन्द्रण या अट्टल चोरट्यांनी त्याच दिवशी दुचाकी चोरून थेट पनवेल गाठले. पनवेल येथे एका गॅरेज मालकाला मारहाण करत त्याच्याजवळील स्कोडा गाडी घेऊन धूम ठोकली. त्यानंतर त्यांनी दोन दिवसात थेट तामिळनाडू राज्यातील मदुराई गाठत मंगळवारी रात्री मदुराई येथे या दोघांनी घरफोडी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. चार दिवसात तीन ठिकाणी चोर्या करणार्या या कैद्यांनी पोलीस यंत्रणेला जणू आव्हान दिले आहे. या दोन्ही कुख्यात चोरट्यांची छायाचित्रे सर्व राज्यातील पोलीस ठाण्यात धाडण्यात आल्याचे खडकपाडा पोलिसांनी सांगितले