आधारवाडी कारागृह संशयाच्या भोवर्‍यात

0

कल्याण । आधारवाडी कारागृहात मोबाईल सापडण्याच्या घटना वारंवार घडत असतानाच या कारागृहातून दोन कैद्यांनी पळ काढल्याची घटना घडल्याने या कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले होते. त्यात काही दिवसांपूर्वी कारागृहात संशयास्पद एका खड्डा आढळून आला होता. या सर्व घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा आधारवाडी कारागृहात एका कैद्याजवळ मोबाईल आढळून आला आहे. कल्याणमधील आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत असलेला संतोष शिंदे या कैद्याजवळ तुरुंग अधिकारी संतोष खारतोडे यांची गस्त सुरु असताना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कारागृहात एक मोबाइल आढळून आला. याप्रकरणी तुरुंग अधिकारी संतोष खारतोडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात कैदी संतोष शिंदे विरोधात गुन्हा केला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा कल्याणमधील आधारवाडी कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून वाढत्या घटनेने प्रशासनाची चिंताही वाढली आहे.

कारागृहात शिक्षा भोगणार्‍या कैद्याची संख्या क्षमतेच्या तिप्पट झाल्यामुळे नव्या कैद्यांना झोपण्यासाठीदेखील जागा नाही. यामुळे नव्या कैद्यांना आधारवाडी कारागृहात पाठवू नये, या कारागृह प्रशासनाच्या विनंतीनंतर काही दिवस या कारागृहात नवे कैदी पाठवले जात नव्हते. मात्र, महिनाभराच्या कालावधीनंतर पुन्हा कारागृहात कैद्याची रवानगी केली जात आहे. आधारवाडी कारागृहाची कैदी ठेवण्याची क्षमता 540 इतकी असताना कच्चे कैदी, महिला कैदी आणि त्यांची मुले असे 1600 कैदी कोंबण्यात आले आहेत. कारागृहातील वाढत्या कैद्यांमुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे कल्याणमधील आधारवाडी कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे.

पोलीस तपास सुरू
खडकपाडा पोलीस ठाण्यात शिंदे याने कारागृहात मोबाइल निषिद्ध असतानाही मोबाइल बाळगून आदेशाचा भंग केला. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याने हा मोबाइल कुठून व कसा आणला याबाबत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी कारागृह प्रशासनाने तपासकार्याला सुरुवात केली असून त्यादृष्टीने पोलीस चौकशी सुरू असल्याचे समजते.

23 जुलै 2017
कल्याणच्या पश्‍चिम भागात असलेल्या आधारवाडी कारागृहातून मणिशंकर नाडर आणि डेव्हिड देवेंद्रन पळून गेले होते. त्यानंतर तेथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. पळ काढणारे हे दोघेही जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. या दोघांवर दरोडे व चोरीचे 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

26 ऑगस्ट 2017
आधारवाडी कारागृहातील सर्कल क्रमांक पाच मधील पाण्याच्या हौदाजवळ एका पहारेकर्‍याला एक खड्डा आढळला. पहारेकर्‍याला संशय आल्याने त्याने या खड्ड्यातील वाळू बाजूला केली. यावेळी या खड्ड्यात प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला एक मोबाईल आढळून आला होता.

वाढत्या कैद्यांमुळे सुरक्षा यंत्रणेवर पडतोय ताण
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे पोलीस यांची सांगड घालता एका कर्मचार्‍यांना 35 ते 40 कैद्यावर नजर ठेवावी लागते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहातील कैद्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले आहे. जामिनावर सुटणार्‍या किंवा शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर पडणार्‍या कैद्याची संख्या अल्प असल्यामुळे तुरुंगातील कैद्यांची संख्या दिवसाला वाढत आहे. यामुळेच तुरुंगधिकार्‍यांना या तुरुंगातील प्रशासन सांभाळणे अवघड बनले आहे. यामुळे नव्या कैद्यांना आधारवाडी कारागृहात पाठवू नये या कारागृह प्रशासनाच्या विनंती केली होती.