कल्याण । डोंबिवली शहरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याचा मुद्दा आजच्या स्थायी समितीच्या सभेत उपस्थित झाला. त्यावेळी हा कचरा वाहून नेणार्या वाहनांना आधारवाडी क्षेपणभूमीवर जायला चांगला रस्ता नसल्याने तेथील टेकडीवर कचर्यातून वाहने न्यावी लागून वाहने नादुरुस्त होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. उन्हाळ्यात अशी परिस्थिती असेल तर पावसाळ्यात बिकट परिस्थिती उद्भवण्याची भीती स्थायी समितीत व्यक्त करण्यात आली. सदस्य दिपेश म्हात्रे यांनी डोंबिवली शहरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याचा मुद्दा आजच्या स्थायी समितीत उपस्थित केला. त्यावर माहिती देताना प्रशासनातर्फे डोंबिवलीतील कचरा उचलणारी 4 वाहने नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याने ही समस्या उद्भवल्याचे सांगण्यात आले. सदस्यांकडून अधिक विचारणा करण्यात आली असता वाहन विभागाकडून हा कचरा वाहून नेणार्या वाहनांना आधारवाडी क्षेपणभूमीवर कचरा टाकण्यासाठी जायला चांगला रस्ता नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तेथील टेकडीवर कचर्यातून वाहने न्यावी लागून उतारावर वाहने नादुरुस्त होत असल्याचा धक्कादायक प्रकार यावेळी उघड झाला. उन्हाळ्यात क्षेपणभूमीवर अशी परिस्थिती असेल तर पावसाळ्यात ही समस्या गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यावर पावसाळ्यात वाहने टेकडीवर जाणारच नाहीत, अशी कबुली प्रशासनाकडून देण्यात आली. सभापती राहुल दामले यांनी यावर 8-10 दिवसांत उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
तत्पूर्वी स्थायी समितीत मोहोने उदंचन केंद्र व बारावे जलशुद्धीकरण केंद्राचे यंत्रसामग्रीसह देखभाल, दुरुस्ती निगा मनुष्यबळासह दोन वर्षे कालावधीकरिता चालविण्याच्या कामाचा 4 कोटी 29 लाख 84 हजार रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यापूर्वी मोहोने उदंचन केंद्र व बारावे जलशुद्धीकरण केंद्राचे यंत्रसामग्रीसह देखभाल-दुरुस्ती करण्याच्या कामाला वेळोवेळी मुदतवाढ देण्याच्या व प्रस्ताव उशिरा मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आणण्याच्या बाबीला सदस्य दिपेश म्हात्रे यांनी हरकत घेतली. तर माधुरी काळे यांनी मोहोने येथील संप वारंवार बंद पडत असल्याचा मुद्दा मांडला. त्याचप्रमाणे या कामासाठी ठेकेदारामार्फत किती मनुष्यबळ नेमण्यात येणार आहे, असा सवाल करीत त्या कर्मचार्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळते की नाही यावर महापालिकेचे नियंत्रण असणार आहे का असाही मुद्दा काळे यांनी उपस्थित केला. त्याला प्रशासनातर्फे माहिती देताना प्रभारी कार्यकारी अभियंता राजीव पथक यांनी मोहिलीचा संप टाटाच्या फिडरवरून आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास संप बंद पडतो अशी माहिती दिली. तसेच या कामासाठी किती मनुष्यबळ नेमण्यात येणार आहे त्याबाबत ते कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत. मात्र, त्यानंतरही पाणीपुरवठ्याचा अत्यावश्यक विषय असल्याने या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.त्याचप्रमाणे कार्यालयीन कामासाठी टी परवाना असलेली वाहने खासगी पुरवठादारांकडून घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. दोन वर्षांसाठी हा ठेका देण्यात येणार असून त्यासाठी सुमारे दीड ते दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.
अधिकार्यांच्या निषेधार्थ सभा तहकूब; आयुक्तांच्या विनंतीवरून सुरू
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आज बोलाविण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सभेसाठी अधिकारीवर्ग उपस्थित नसल्यामुळे सभापतींनी स्थायी समितीची सभाच तहकूब केली. दरम्यान, आयुक्त बोडके यांनी सभापतींशी दूरध्वनीद्वारे चर्चा केल्यानंतर सभा पुन्हा पुढे सुरू करण्यात आली. गेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये स्थायी समितीच्या सभांना सर्वच विभागाचे अधिकारी हजर असावेत, असा आदेश सभापतींनी दिला होता. सभापतींनी तसा आयुक्तांशी पत्रव्यवहारही केला होता. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी एका परिपत्रकान्वये सर्वच विभागांच्या अधिकार्यांनी स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहण्याचे सक्त आदेश दिले. मात्र, आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता सात विभागांचे अधिकारी आजच्या सभेसाठी आले नाहीत. त्यात आयुक्तांच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्तदेखील उपस्थित नव्हते. यावेळी काही सदस्यांनी अधिकार्यांच्या अनुपस्थितीचा विषय उपस्थित केला. सभापती राहुल दामले यांनीही आयुक्तांचे आदेश अधिकारी मानत नाहीत. त्यामुळे गैरहजर असणार्या अधिकार्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करताना प्रशासनाच्या निषेधार्थ सभाच तहकूब केली. आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून सभेला उपस्थित राहिलेले उपायुक्त सुरेश पवार यांनीही माझा विषय असेल तर सभेला येतो, असे म्हटल्याचा उल्लेख करीत सभापती दामले यांनी याबाबतचा खुलासा आयुक्तांना द्या, असे पवार यांना सुनावले.