सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दिलासा
नवी दिल्ली : बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाबरोबर आधार जोडणीच्या सक्तीवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आधार कार्ड जोडणीवर अंतिम निर्णय नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात देण्यात येणार असल्यामुळे त्यावर सध्या तरी कसल्याही प्रकारची बंदी घालण्यात येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
नोव्हेंबरअखेर घेणार सुनावणी
सर्व बँक खाते आणि मोबाईल क्रमांक यांना आधार कार्डशी जोडले जावे, अशी सक्ती केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणार्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच ही सक्ती रद्द करण्यात यावी, असेदेखील या याचिकांमध्ये म्हटले गेले होते. परंतु, या याचिकांवर नोव्हेंबरअखेर सुनावणी करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने या अगोदर स्पष्ट केले होते. त्यामुळे आजच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हेच कारण देत आधार सक्तीवर बंदी घालण्यास नकार दिला. केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशभरात सर्व नागरिकांना 31 डिसेंबरपर्यंत आपले बँक खाते तसेच 6 फेब्रुवारी 2018 पर्यंत आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य केले आहे. या आदेशाचे पालन न केल्यास नागरिकांच्या बँक व्यवहार आणि मोबाईल संपर्काला अडथळा होऊ शकतो, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.