आधार केंद्रांचे लोकार्पण

0

चिंचवड : मावळ लोकसभेच्या एकोणिस विभागीय पोस्ट कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पुणे विभागाचे क्षेत्रीय पोस्ट कार्यालय अधिकारी अभिजीत बनसोडे तसेच पुणे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, पोस्ट विभागाचे अधिकारी सामदास गायकवाड व के.आर.कोरडे उपस्थित होते.

नागरिकांच्या सोयीसाठी आधार केंद्र सुरू करण्याच्या सूचना सरकारने दिले आहे. त्याच अनुषंगाने मावळ लोकसभेच्या एकोणिस विभागीय पोस्ट ऑफीस कार्यालयात एकाच वेळी आधार केंद्राची सुरुवात करण्यात आली. यामध्ये चिंचवड स्टेशन चिंचवडगांव, आकुर्डी, औंधकॅम्प, सी.एम.ई (दापोडी), दापोडी, कासारवाडी पिंपरी-चिंचवड प्राधिकरण कार्यालय, पिंपळेगुरव, पिंपरी कॅम्प, पिंपरीगांव, देहू, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड, तळेगाव, तळेगाव स्टेशन, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा, लोणावळा बाजार या ठिकाणी आधार केंद्राची सुरुवात करण्यात आली.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उत्तम काम करणारे कर्मचारी तसेच पोस्टमनचा सन्मान करण्यात आला. पोस्टमन उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सायकलवर प्रवास करून नागरिकांची पोस्टाची पत्रे आजही वेळेवर घरी पोहचवतो.ही उल्लेखनीय बाब असून पोस्टमनचा सन्मान केल्याने खऱ्या व्यक्तीचा सन्मान होतो. याचा मला अभिमान वाटतो, असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.

आधार कार्ड हे सर्व शासकीय कागद पत्राचा एक भाग झाल्याने नागरिकांना आधार कार्ड काढण्याबरोबरच त्यामधील त्रुटी देखील दूर करण्यासाठी या सर्व केंद्राचा उपयोग होईल. याचबरोबर नागरिकांना तात्काळ आधार कार्ड काढण्यासाठी याचा उपयोग होऊन वेळेची बचतही होईल. केंद्र सरकारच्या संचार मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही आधार केंद्राची सेवा सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यात यावी, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोस्ट कर्मचाऱ्यांना केल्या. आभार प्रदर्शन के. आर. कोरडे यांनी केले.