आधार ची माहिती असुरक्षित!

0

दिल्ली : भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या एकुण 210 पेक्षा जास्त संकेतस्थळांवर आधारधारकांची नावे, पत्ते आदी माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. युआयडीएआयने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीतून ही खळबळजनक बाब समोर आली आहे. तसेच हेदेखील सांगण्यात आले की प्राधिकरणाने ही माहिती आता हटविली आहे. माहिती सार्वजनिक करण्याच्या नियमाचे उल्लंघन कधी करण्यात आले याबाबत मात्र काही सांगण्यात आले नाही.

तातडीने माहिती काढून टाकली
युआयडीएआय एक बारा अंकी विशेष ओळख क्रमांक नागरिकांना देते ज्यावरून त्यांची ओळख, पत्ता यांचा अधिकृत पुरावा ग्राह्य धरला जातो. केंद्र सरकारने अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. यासंदर्भात युआयएडीआयने सांगितले की, आमच्याकडून कधीही आधारची माहिती सार्वजनिक करण्यात आली नाही. शैक्षणिक संस्थांसह केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या विविध विभागांच्या सुमारे 210 संकेतस्थळांवर आधार कार्डधारक व्यक्तींची नावे, पत्ते व अन्य माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. यानंतर युआयएडीएआयने तातडीने ही माहिती या संकेतस्थळांवरून हटविण्यास सांगितले.

आधारची माहिती सुरक्षित
आरटीआयअंतर्गत माहिती मागितली असता सांगण्यात आले की, युआयडीएआयने आधारची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्याने चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या अधुनिक तंत्रज्ञानामुळे आधारची माहिती नेहमी सुरक्षित असते. सातत्याने याबाबत परिक्षण करण्यात येते व त्यानुसार बदलही करण्यात येतात. युआयडीएआय तसेच अन्य ठिकाणी ही माहिती सुरक्षित राहिल अशी उपाययोजना करण्यात आली आहे. आधारची माहिती अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि परिपुर्ण करण्यासाठी प्रत्येक पाऊल योग्यवेळी उचलले जात असल्याचा आयडीएआयने केला आहे. मात्र, 210 संकेतस्थळांवर ही माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचा गैरवापर झाला असेल किंवा कसे याबाबत मात्र, कुणीही सांगू शकत नाही.