‘आधार’ जोडणीसाठी अंतिम तारीख ’31 मार्च’

0

नवी दिल्ली : केंद्र व राज्य सरकारी योजना, बँक खाते तसेच मोबाईल क्रमांकाशी आधार क्रमांक जोडण्यासाठी 31 मार्च 2018 ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने शुक्रवारी या संबंधी घोषणा केली असून, आधारकार्ड जोडणीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे 31 मार्चपर्यंत नागरिकांनी आपला आधार क्रमांक सरकारी योजना तसेच इतर बाबींशी जोडून घ्यावेत, असे आवाहन न्यायालयाने केले आहे.

केंद्राचे प्रतिज्ञापत्र स्वीकारले
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांची पडताळणी करण्यासाठी बँक खात्यांची चौकशी आणि त्यासाठी आधार कार्डमुळे होत असलेली सुविधा या संबंधी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात काल आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. आधार कार्डमुळे बोगस बँक खात्यांची ओळख करता येते, तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये तपास करण्यासाठी त्याचा अधिक फायदा होतो, असे सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. तसेच बँक खात्यांशी आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2018पर्यंतदेखील वाढवण्याची तयारी दर्शवली होती. यानंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. के. सिक्री, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि अशोक भूषण यांनी याला मान्यता देत, मोबाईल क्रमांक आणि सरकारी योजनांबरोबरदेखील आधार क्रमांक जोडण्यासाठी 31 मार्च 2018 हीच अंतिम तारीख देण्याविषयी सरकारकडे विचारणा केली व केंद्र सरकारनेदेखील यासंबंधी सहमती दर्शवल्यानंतर न्यायालयाने या विषयी अधिकृत घोषणा केली.

17 जानेवारीच्या सुनावणीवर लक्ष
आधार कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असून, या याचिकेवर येत्या 17 जानेवारीरोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीपर्यंत हा अंतरिम आदेश देण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे जानेवारीतील सुनावणीवर या अंतरिम आदेशाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.