पुणे । जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या सोयीसाठी आधार नोंदणी आणि त्यातील दुरुस्त्यांसाठी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिन्याच्या दुसर्या आठवड्यात हे शिबिर होणार असून त्यासाठी सर्व क्षेत्रिय कार्यालयात प्रत्येक पाच आधार मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे शिबिर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये होणार आहे. त्यामुळे नागरिकांना नवीन आधार कार्डबरोबरच ज्यांच्या आधार कार्डमध्ये चुका आहेत त्या दुरूस्त करून घेता येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राज्य शासनाने सर्व योजनांसाठी आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक केले आहे. त्यामध्ये निवृत्ती वेतनासह विविध योजनांसाठी बंधनकारक आहे. तसेच आयकर विभागाने पॅनकार्ड आधार कार्डांशी जोडणी करणे बंधनकारक केले आहे. परंतु यापूर्वी आधार नोंदणी केलेल्यांच्या कार्डात अनेक नाव, पत्ता, जन्मतारीख यामध्ये चुका झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तसेच कार्ड दुरुस्तीचे केंद्रांची संख्याही अतिशय कमी आहे. परिणामी नागरिकांना कार्डातील दुरुस्तीसाठी वणवण फिरवावे लागत आहे.
सर्व क्षेत्रिय कार्यालयात मोहीम
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये दि. 7 आणि 8 रोजी महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात आधार नोंदणी व कार्डातील दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तर दि. 9 आणि 10 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीचे कामे करून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.