आधार नोंदणी अभियानाची मुदत महिनाभर वाढवा

0

नगरसेवक उत्तम केंदळे यांची प्रशासनाकडे मागणी

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये दोन दिवसीय आधार नोंदणी व दुरुस्ती विशेष अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ही मुदत महिनाभर वाढविण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व सहाय्यक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना निवेदन दिले आहे. यावेळी भाजप नेते बापू घोलप, उमेश घोडेकर, प्रशांत बाराथे, कौस्तुभ देशपांडे, श्रीकांत सुतार उपस्थित होते.

अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये नवीन आधारकार्ड व दुरुस्तीसाठी दोन दिवसीय विशेष अभियान राबवण्यात येत असून, त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर नवीन नोंदणी व दुरुस्तीसाठी नागरिक क्षेत्रिय कार्यालयावर गर्दी करत आहेत. नोंदणी अधिकारी ठराविक नागरिकांचे अर्ज जमा करीत आहेत. त्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडत आहे. हा गोंधळ दूर करून विशेष अभियानाची मुदत वाढवावी, अशी मागणी नगरसेवक केंदळे यांनी केली आहे.

प्रत्येक शासकीय व बिगर शासकीय कार्यालयात आधारकार्ड सक्तीचे करण्यात येत असल्यामुळे याची मोठ्या प्रमाणावर गरज नागरिकांना भासत आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनाही शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती या कामी आधारकार्ड गरजेचे आहे. बर्‍याच नागरिकांनी आधारकार्ड काढले. परंतु, त्यात दुरुस्ती असल्यामुळे त्यांना जागोजागी त्रास सहन करावा लागत आहे. तर काहीचे आधारकार्ड संपूर्ण पत्त्याच्या अभावामुळे त्यांना मिळालेच नाहीत. अशा कित्येक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते.