आधार फाउंडेशनला हवी वृक्ष छाटणी

0

नेरुळ । आपला आधार फाउंडेशन नेहमीच शहरातील समस्यांचा पाठपुरावा करून त्या निवारण करण्याचा प्रयत्न करते. पनवेल शहरातील मुख्य रस्ता म्हणून समजल्या जाणार्‍या श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळा येथील परिसरातील आजूबाजूला वाढलेल्या झाडांमुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा पूर्णपणे झाकला गेला आहे. तेथील आजूबाजूला वाढलेली झाडे यांची छाटणी करण्यासाठी आपला आधार फाउंडेशनच्या वतीने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये झाडांची छाटणी करण्याची मागणी केली आहे.

पनवेल शहरातील नागरिकांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा एकमेव असून असा पुतळा शहरात कुठेही नाही. पनवेल शहरातील अनेक शिवप्रेमींचे हे श्रद्धास्थान असून या ठिकाणी दर आठवड्याला विविध शिवप्रेमी संस्थांतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आरती या ठिकाणी मनोभावे केली जाते, तरी आपण या प्रकाराकडे विशेष लक्ष देऊन पुतळ्याच्या आजूबाजूला वाढलेल्या झाडांची छाटणी करावी तसेच शक्य असल्यास श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती एक छत्री बसवावी, अशी मागणी आपला आधार फाउंडेशनच्या वतीने लेखी पत्राद्वारे केली आहे तसेच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी या पत्राची दखल त्वरित घेऊन लवकरात लवकर झाडांची छाटणी करून महाराजांचा पुतळा सर्वांना दिसेल असे करावे.