पुणे । पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील तांत्रिक अडचणीमुळे ठप्प झालेले आधार नोंदणीचे काम पर्ववत सूरू झाले आहे.जिल्ह्यातील 210 पैकी 187 आधार केंद्र सुरू झाली असून उर्वरित आधार केंद्र येत्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याचा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.नागरीकांना विविध खात्यांना आधार क्रमांक लिंक करण्यासाठी 31 मार्च अखेर केंद्र सरकारने मुदत दिली आहे. त्यामुळे आधार नोंदणी करण्याबरोबरच आधारमधील दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र गुरुवारी (दि. 8) आधारच्या मुख्य सर्व्हरमधील सेक्युअर्ड फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलमध्ये’ (एसएफटीपी) तांत्रिक बिघाड झाल्याने आधार नोंदणीची यंत्रणा ठप्प झाली होती.
माहिती अपलोड करण्यास अडचण
सेक्युअर्ड फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल या गेटवेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आधार नोंदणी व दुरूस्ती सेवा पुणे व पिंपरी चिंचवडमधील काही केंद्रे वगळता बहुतांशी केंद्रे गुरूवारपासून बंद आहेत. एसएफटीपी (गेटवे) च्या माध्यमातून आधारच्या मुख्य सर्व्हरवर आधारची माहिती अपलोड केली जाते. मात्र, ही माहिती स्वीकारली जात नव्हती. याबरोबरच आधार यंत्रांमधून पाच दिवसांपर्यंत साठविलेली माहिती अपलोड न केल्यास यंत्र आपोआप बंद पडते. आधार केंद्रांमधून नागरिकांच्या आधारच्या माहितीचा दुरूपयोग केला जाऊ नये म्हणून ही सुविधा करण्यात आली आहे.