आधीच्या कर्जमाफीचा लाभ सधन शेतकर्‍यांनाच

0

जळगाव। शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसंदर्भात सरकार सकारात्मक असून ऑक्टोबरपर्यत राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जाईल. कर्जमाफी गरजू शेतकर्‍यांना मिळाली पाहिजे यासाठी अभ्यास सुरु आहे. मागील सरकारच्या काळात मोठी कर्जमाफी दिली गेली मात्र त्याचा लाभ खर्‍या शेतकर्‍याला न मिळता धनदांडग्यांना मिळाल्याचा ठपका जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी विरोधकांवर ठेवला. शुक्रवारी शहरात दिव्यांगांसाठी मोफत साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

नाशिक जिल्ह्यात संप तीव्र
मुख्यमंत्री फडणवीस शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत चर्चेस तयार असून शेतकरी संघटनांनी चर्चेतून प्रश्‍न सोडविले पाहिजे. खर्‍या व गरजु शेतकर्‍याला कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी ते आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी संपाची तिव्रता नाशिक जिल्ह्यात अधिक असल्याने व महाजन हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी शेतकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असे आवाहन केले आहे.

विरोधी पक्षांचे षडयंत्र
शेतकरी कष्टाने भाजीपाला पिकवतो. दोन पैसे अधिक मिळावे म्हणून तो स्वतःच्या घरासाठी दूध ठेवत नाही, सर्व विकतो. संप काळात सर्रास भाजीपाला व दुध रस्त्यावर फेकण्यात आले. खरा शेतकरी कधीच दुधाची व भाजीपाल्याची नासाडी करणार नाही. विरोधकांकडे टीका करण्यासाठी मुद्दे नसून शेतकरी संपामागे विरोधी पक्षांचे षडयंत्र असल्याचे महाजन यांनी सांगितले.