धुळे तालुक्यातील दुर्दैवी घटना ; दहा महिन्यांच्या चिमुरडीचे मातृ-पितृछत्र हरपले
धुळे ः कौटुंबिक भांडणातून संतप्त पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून करीत स्वतः देखील आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील वडेल गावाजवळ बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सविता भाऊसाहेब पाटील (26) या विवाहितेचा मृत्यू झाला तर पती ज्ञानेश्वर उर्फ भाऊसाहेब सुभाष पाटील (29) यानेदेखील दुचाकीसह एका वाहनाखाली झोकून देत आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून आई-बापाच्या मृत्यूने या दाम्पत्याची दहा महिन्यांची चिमुरडी नंदिनी अनाथ झाली आहे. मृत सविता या पालघर येथे शिक्षिका म्हणून नोकरीस होत्या. सुट्या असल्याने त्या माहेरी निकुंभे येथे परतल्या होत्या.
वादानंतर केला पत्नीचा खून
बुधवारी सकाळी पती-पत्नीसह मुलगी नंदीनी हे धुळ्यातील वाडीभोकर परीसरात आले होते. वडेल गावाकडे जाण्यास ते निघाल्यानंतर दोघांमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला. संतापात पतीने पत्नीवर दगडाने वार करून तिला ठार केले तर घटनेनंतर मुलीला घेऊन ज्ञानेश्वर तेथून पसार होवून तो गोंदूरमार्गे मोराणे गावाकडे आला. कुंडाणे फाट्यावरील पंपावर त्याने मुलगी नंदिनीला उतरवले व तेथून त्याने दुचाकी (एम.एच.18 ए.एम.2023) ला सरळ ट्रक (ए.पी.29 टीए 9077) धडक दिली. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचाही मृत्यू झाला. पश्चिम देवपूर पोलिसात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.