आधी पुनर्वसन मगच वरखेडे धरण बांधा; पिडीतांचा एल्गार

0

चाळीसगाव- वरखेडे धरणाच्या कामाला विरोध नाही ते विकासाचे काम आहे ते झालेच पाहिजे, मात्र आमचे गाव बुडीत क्षेत्रात येत असून आम्हाला जलसमाधी मिळणार आहे. हा आमच्या वर अन्याय आहे असे असताना आम्ही अनेकदा शांततेच्या मार्गाने लढा दिला मात्र रात्रंदिवस काम सुरू आहे. हा आमच्या भावनेशी खेळ आहे याकरिता आधी पुनर्वसन मगच धरण, असा एल्गार करीत धरणाच्या कामाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी जाळी तोडून आत प्रवेश करत काम बंद पाडले.

यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.

आज सकाळी ११ वाजता तामसवाडी येथून ग्रामस्थ, महिला धरणाच्या कार्यस्थळावर पोहचले. हातात थाळी, लाटणे घेऊन घोषणाबाजी करत आंदोलकांनी दणाणून सोडला. एक किलोमीटर पायी हा मोर्चा धरणाच्या कार्यक्षेत्रावर धडकला. याठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक आक्रमक झाले होते. आंदोलनकर्त्यांनी जाळीचे कुंपण तोडून आत प्रवेश केला.

या कामाला गती मिळाली असून लवकर काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असली तरी तामसवाडी गावकऱ्यांनी २२ जून, १५ सप्टेंबर, २२ नोव्हेंबर रोजी प्रांताधिकारी व सिंचन विभागाला निवेदन दिले आहे. यापूर्वी तामसवाडी गावाचा सर्वेक्षणात समावेश नव्हता मात्र नंतर हे गाव ६१% बुडणार असल्याचा अहवाल दिला. ही सिंचन विभागाची लपवाछपवी आमच्या आयुष्याचा खेळ बनली आहे. आम्ही प्रचंड तणावात असून अख्ये गाव प्रकल्प बाधित होणार असूनही आमच्या मागण्यांबाबत शासन उदासीन असल्याचे खात्री झाल्याने आम्ही हा मोर्चा काढला आहे असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यावेळी वरखेडे लोंढे प्रकल्पग्रस्त समिती तामसवाडीचे सल्लागार सुभाष काकुस्ते यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ, महिलांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी वरखेडे लोंढे प्रकल्पग्रस्त कृती समिती तामसवाडी अध्यक्ष सदाशिव दत्तात्रय पाटील, कार्याध्यक्ष रविंद्र विश्वास पाटील, उपाध्यक्ष शिवराम धोंडू पाटील, सचिव सचिन मुरलीधर पाटील, उपाध्यक्ष सचिन कृष्णा पाटील, भगवान जगन्नाथ पाटील, रमेश वामन पाटील, विठोबा निंबा पाटील, अशोक निंबा पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.