नवी दिल्ली – चीनच्या काशगर शहरात रस्त्यावर नमाज पढणे आणि दाढी ठेवण्याला बंदी आणल्यानंतर आता मुस्लिमांना नमाजाआधी मेटल डिटेक्टरच्या तपासणीतून जावे लागणार आहे. देशात फुटीरतावाद रोखण्यासाठी हे सर्व करीत आहोत, असा चीनचा दावा आहे.
राज्यकारभारात ऐहिकता हाच मूळ विचार असलेल्या चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला कोणत्याही धर्माने शासन, प्रशासनास वैचारिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न करू नये असे वाटते. सध्या इस्लाम त्यांच्या रडावर आहे. कारण आंतरराष्ट्रीय दहशतवादाची बीजे येथील मुस्लिमांमध्ये रूजत आहेत, असे चीनचे म्हणणे आहे. एके काळी काशगर मशिदी समोरील चौक नमाज पढण्यासाठी मुस्लिमांनी भरून जाई. तो चौक आता रिता रिता आहे. नमाजासाठी जाताना चीनी सुरक्षा यंत्रणा कसून चौकशी करते. याला कंटाळून मुस्लिम आता घरीच नमाज पढत आहेत.
शिंजियान प्रांतात उइगर मुस्लिम बहुसंख्य आहेत. ते स्वतःला तुर्क मानतात आणि भाषाही तुर्कीच बोलतात. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची कडक नजर मुस्लिमांवर आहे. त्यांच्या मते देशात फुटीरतेची बीजे रूजू नये म्हणून मुस्लिमांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सरकारी कार्यालयांमध्ये पाच वेळा नमाज पठण करण्यावरही चीनने बंदी आणलेली आहे. महिलांना सार्वजनिक जागी बुरखा घालण्यास चीनमध्ये बंदी आहे. चीनमध्ये कोठेही आतंकवादी हल्ले झाले तर उइगर मुस्लिमांवर चीनचे सरकार ठपका ठेवते. येथील अनेक तरूण इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाले आहेत.
ट्रोब विद्यापीठाचे चीन अभ्यासक जेम्स लीबोल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार २००९ मध्ये उरुमकी शहरात दंगली झाल्या होत्या. तेव्हा पासून चीनने खास धोरण आणून मुस्लिमांना नमविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नमाजाला जाताना मेटल डिटेक्टर तपासणी हा त्याचाच एक भाग आहे.