पावावे निर्वाणी गणाधीशा, एक फोटो सध्या वायरल होत आहे. तुझी माता तुला सांगते की, ‘सावकाश जा. तिकडे गेल्यावर जास्त मोदक खाऊ नकोस आणि येताना प्लीज, ते सोनू माझ्यावर भरोसा नाय का, वगैरे गाणी पाठ करून येऊ नकोस. गेल्या वर्षी शांताबाई आणि सैराट ऐकून डोकं दुखलं आमचं…’ या चित्रातला आणि वाक्यातला विनोद फारच गंभीर आहे. तू ते मनावर घेशीलच. पण आम्हाला थोडी तरी बुद्धी दे की, तुझे वेध लागले असताना किमान अशी थिल्लर गाणी तरी वाजवण्याची आम्हाला गरज भासू नयेत.
बाप्पा, खरंच संकटं फार वाढलीत. रक्षण कर आम्हा पामरांचं. प्रतिवर्षीप्रमाणे तू यंदाही येतोहेस. आल्या आल्या तुझ्या कानावर हे गार्हाणे घालण्याची प्रामाणिक अगतिकता आम्ही करीत आहोत. या आगळिकीबद्दल माफ कर, कान काप, पण आमची कामनापूर्ती कर देवा. तुझिया चरणी लीन आणि नतमस्तक होताना आम्ही तुला शरण आलो आहोत. गतवर्षी तुझं विसर्जन करताना ‘पुढल्या वर्षी लवकर या’चा वाजत-गाजत गजर केला आम्ही. तुझ्या विरहाचं दुःखही आम्ही ‘एन्जॉय’ केलं. ड्रम, ताशा, नाशिक बाजा, डीजे, मोठ्या मिरवणुका, झांज, नाच, गुलाल यांच्या गदारोळात सर्वत्र दणका उडाला. पाण्यात विसर्जित होताना गणराया, तुला पुढल्या वर्षीचा धोका जाणवला नसेल म्हणूनच तू यंदा लवकरच आलास.
वातुंडा, यंदा राजकारण, समाजकारण, जागतिकीकरण, कला, क्रीडा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, रसायन वगैरे वगैरे विषयात प्रचंड उलथापालथा झाली. नोटाबंदीपासून सर्जिकल स्ट्राइकपर्यंत, युद्धापासून खेळापर्यंत आणि निवडणुकीपासून कर्जमाफीपर्यंत आणि दुष्काळापासून महापुरापर्यंत सर्वत्र हाहाकार उडाला. त्याची कथा आणि व्यथा आळवण्याची ही वेळ नव्हे. सुखकर्ता दुःखहर्ता मंगलमूर्ती गणपतीबाप्पा तू सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, सर्वबुद्धिमान, सर्वेश्वर आहेस. सर्वसामान्य माणसाची तितकीच सर्वसामान्य परिस्थिती तुला दिसते. म्हणूनच तुझी मनोभावे प्रार्थना करतानाच गार्हाणे घालण्याची हिंमत करतो.
हे गजानना, ‘सौख्य-समृद्धीच्या धर्म संकल्पनांवर जेव्हा जेव्हा आक्रमण होईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन’, असे परमेश्वराने म्हटले आहे. पण सध्याची विदारक, सामाजिक परिस्थिती आणि देशाला, धर्माला आलेली ‘अधर्मस्य ग्लानी’ पाहता त्या जगन्नियंत्याने आपला निश्चय पुढे ढकलला असल्याचे दिसते. ते का? असं प्रश्न आम्ही तुला विचारण्याचं धाडस करणार नाही रे बाप्पा.
श्री गणराया, तू येत आहेस. तुझं आगमन होत आहे. पण या आनंदोत्सवाच्या आधी विविध ठिकाणी समाजमनावर हल्ले झाले, चांगुलपणावर वार झाले, नैतिकतेचे रक्त वाहून गेले. पण तरीही ‘त्यामाजिं अवचित हालाहल उठिलें, तें त्वां असुरपणें प्राशन केलें’ अशा स्वाभिमानी जीवनप्रेमी माणसांनी ‘पुनःश्च हरी ओम’ म्हणून आपले कार्य सुरू ठेवले. सारी माणुसकी ‘वारी वारी जन्म मरणान्ते वारी’ म्हणत सुख-दुःखाच्या प्रवासाला सज्ज झाली. दिवसरात्र आम्हा ‘युद्धाचा प्रसंग’ असतो, पण त्यातूनही तावून सुलाखून अस्संल बावनकशी जीवननिष्ठेचं सोनं दिसून येतं, ते अशाच अस्मितेमुळे.
हे वरदविनायका, ठिकठिकाणी अन्याय, अत्याचार, दंगली, बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले, घुसखोरी, सूड, स्फोटक वातावरण, पराभव, हताशता, दैन्य, संपलेपण यातच समाज आणि मन भरलेलं आणि भारलेलं असतानाही सहिष्णुतेचा पुरस्कार करण्याची कुठली अजब शक्ती आमच्या ठायी आहे? नाही, देवा गणराया, आम्ही नाही अतिरेक करणार; करू शकणार! आमचा ‘संकटी पावणार्या आणि निर्वाणी रक्षणार्यां’ जगन्नियंत्या हे विघ्नहर्त्या, तुझ्यावर ठाम विश्वास आहे!
‘गजानना श्रीगणराया, आधी वंदू तूज मोरया’ म्हणत भक्तिभावाने तुझं स्वागत करण्यास आम्ही सारे आतुर आहोत. वाजत-गाजत अतिउत्साहात आम्ही तुझं आगमन साजरं करतो, कुठे ‘गणेश फेस्टिव्हल’ असतात, तर कुठे पारंपरिक गणेशोत्सव. कुठे धांगडधिंगा असतो तर कुठे पावित्र्य, धार्मिकता, भक्तिपूर्ण वातावरण असते. कुठे सर्वधर्मसमभाव असतो तर कुठे धार्मिक तेढ असते. कुठे पत्ते जुगार यांनी रात्ररात्र बर्बाद होते, तर कुठे समाज प्रबोधनात्मक देखावे उभारून सत्कार्य करण्यात कार्यकर्ते गुंतलेले असतात.श्रीगणेशा, काही सार्वजनिक मंडळे अवाढव्य खर्च करून मंडप उभारतात. नको एवढी लायटिंग, भव्यदिव्यता, अतिभव्य देखावे, गणपती मूर्तीपेक्षा भारदस्त इतर गोष्टींवर भर दिला जातो. रिमिक्स संस्कृतीतली आगापिछा नसलेली घाणेरडी गाणी लावली जातात आणि गणेशोत्सवाचे मूळ उद्देश बाजूला ठेवले जाते.
लोकमान्य टिळकांनी जनजागृती, तरुणाईची जनशक्ती आणि सामाजिक प्रबोधनाच्या हेतूने समूहशक्तीचा पुरस्कार करणारे गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले, त्याची आज फार मोजक्या मंडळांना आणि कार्यकर्त्यांना आठवण आहे. एकीकडे सामाजिक र्हास व दैनंदिन दुःख यातनांचा पाऊस पडत असताना सुख समृद्धीची व चांगुलपणा, नैतिकता यांची जोपासना झाली पाहिजे. कलागुणांचा विकास झाला पाहिजे. विद्येची देवता असणारा ‘गुणपती-गणपती’ प्रसन्न झाला पाहिजे. सौख्य-समृद्धी, परस्परांबद्दल आनंदभाव तनमनात फुलला पाहिजे, असंही आमचं संवेदनशील मन म्हणतं.
तेव्हा हे लंबोदरा, विघ्नेशा, ‘म्लेंच्छ मर्दन करिसीं म्हणून कलंकित झालेला मानवधर्म’ आम्हाला पुन्हा जाज्वल्य करण्याची शक्ती दे. समृद्धी, सुख, आनंद, आरोग्य, समाधान, आत्मज्ञान, स्वाभिमान यांचा विकास करण्यास्तव आमचा जन्म सार्थक ठरू दे. हे श्री गणराया, तुझिया चरणी लीन होत आम्ही यशोगाथेची प्रार्थना करीत आहोत-
‘भाव भगतसे कोई शरणागत आवें।
संतती संपत्ती सबही भरपूर पावें।
ऐसें तुम महाराज मोको अति भावें।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावें॥’
– तुझाच मी पामर गणभक्त
– विनोद पितळे
साहित्यिक, 9819104612