शिक्रापूर । महाराष्ट्राला अनेक संतांकडून अध्यात्मिक वारसा लाभला आहे. आधुनिक काळातही आषाढीवारीतील भाविकांची संख्या वाढताना दिसत आहे. आजही ग्रामीण भागात हरीनाम सप्ताहाला गर्दी पाहावयास मिळते, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप यांनी केले. शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे अखंड हरीनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाच्या प्रारंभी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.सप्ताहाच्या सुरुवातील सुभाष उमाप व म्हस्कोबा साखर कारखान्याचे व्यवस्थापक प्रकाश मते यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले. शिरूर तालुका अध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असून येथील प्रतीपंढरपूर याठिकाणी भाविकांची गर्दी वाढताना दिसत असल्याचे उमाप यांनी यावेळी सांगितले. विणापुजन गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्या हस्ते झाले. यावेळी निवृत्तीअण्णा गवारे, काळूअण्णा गवारे, सरपंच अलका राऊत, उपसरपंच बाबाजी गवारे, बबन गवारे, लक्ष्मण गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.
एकोप्यामुळे गावाचा विकास
हरीनाम सप्ताहाचे हे 37 वे वर्ष असून, या गावातील सर्वच मंडळी एकोप्याने राहून गावातील विकासाबरोबर सामाजिक, धार्मिक कामे एकत्रित करतात, असे उमाप यांनी पुढे सांगितले. या साप्ताहाच्या काळात ह.भ.प. बालाजी मोहिते (बीड), देवराम गायकवाड (दौंड), सुरेश साठे (वाळकी), विष्णू खंडेभराड (आळंदी), सुभाष जाधव (नीरा), एकनाथ माने (बीड), माउली कदम (आळंदी), लक्ष्मण कोकाटे (बारामती) यांची कीर्तनरूपी सेवा होणार आहे. तसेच दैनंदिन कार्यक्रमात काकडा विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन व जागर असे कार्यक्रम घेण्यात आले. संभाजी गवारे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन रघुनंदन गवारे यांनी केले.