पुणे : बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या ‘आनंदवना’ला पुढे नेण्याचे काम डॉ. विकास आमटे यांनी केले. आमटेंची तिसरी पिढी आता आनंदवनात कार्यरत आहे. आनंदवनातील त्यांचे कार्य व त्यांनी राबवलेल्या प्रयोगांची कहाणी डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘आनंदवनाचा विकास’ या पुस्तकात मांडली असून, विश्वकर्मा पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. याचे प्रकाशन इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये शनिवारी (दि. 29) सायं. 5 वाजता यशदा येथे डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते होणार आहे. यात विकास आमटे यांच्यासह डॉ. भारती आमटे व डॉ. शीतल आमटे यांच्याशी संवाद साधण्यात येणार असून, डॉ. मंदार परांजपे त्यांच्याशी संवाद साधतील. तसेच डॉ. जयश्री तोडकर व संतोष शेणई लिखित ‘ओबेसिटी मंत्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार असल्याचे विशाल सोनी यांनी सांगितले.