आनंदवार्ता : कोरोनावाढीचा वेग मंदावला

0

नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १४ दिवसांमध्ये १३.२४ टक्क्यांवरून २५.१९ वर गेले आहे. देशाचा रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी वेग ३.४ वरून ११ दिवसांवर आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावाधी वाढल्याने आरोग्य यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फेेदेण्यात आली.

देशात करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ३५ हजारांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार १ मे रोजी सकाळी देशातील करोनाग्रस्तांची संख्या ३५ हजार ४३ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे देशभरात १ हजार १४७ जणांचा मृत्यू झाले असून आतापर्यंत ८ हजार ८८८ रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १० हजार ४९८ वर पोहोचली आहे.

दक्षिणेकडील आणि पूर्वोत्तर राज्यांचे काम कौतुकास्पद

कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत दक्षिणेकडील आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांनी लक्षणीय आघाडी घेतली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ आणि हरियाणा या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर ३ टक्क्यांहून कमी आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा काळ २० दिवसांवर पोहोचला आहे. तर पूर्वोत्तर भारतात हा दर जवळपास शुन्यावर पोहोचला आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरही कोरोना रुग्णांच्या वाढीसाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

गेल्या १० दिवसांचा विचार केल्यास कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी ३६ दिवसांवर पोहेचला आहे. तर हरियाणामध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी ३५ दिवस लागले आहेत. तर उत्तर प्रदेशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यास २४ दिवस लागले आहेत.

राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाम जास्त असले तरी आता हे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी १८ दिवसांवर पोहोचले आहे. तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल पंजाब आणि गुजरातमध्ये रुग्णसंख्या दुप्पच होण्यासाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे. सकारात्मक बाब म्हणजे मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि गोवा या राज्यांमध्ये आजच्या घडीला कोरोनाचा एकही रुग्ण नाही आहे. या राज्यांमधील सर्व कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सिक्कीम, नागालँड, दमण-दीव आणि लक्षद्विप येथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.