त्रिपुरा – देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांना दिलासादायक घटना समोर आली आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही तीन राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत. त्यानंतर आता आणखी एक राज्य कोरोनामुक्त झाले आहे. त्रिपुरा हे राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केली आहे.
त्रिपुरामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. या दोन्ही रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता या दोघांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्रिपुरा हे राज्य आता कोरोनामुक्त झाले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही आनंदाची माहिती शेअर केली आहे.
‘ही’ राज्य अन् केेंद्रशासित प्रदेश कोरोनामुक्त
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गोवा आधीच कोरोनामुक्त झाले होते. आता अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत. गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या तिन्ही राज्यात कोरोनाचे काही रुग्ण सापडले होते. मात्र आता या राज्यातील कोरोनाच्या सर्व रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात काही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. नागालँड आणि सिक्कीम या राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. तसेच दमण दिव, दादरा आणि नगर हवेली, लक्षदीप या केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.