जळगाव। महाबळ कॉलनीला लागून असलेल्या आनंद नगरात शोभा हिरामण पाटील यांच्या बंद घराचे टॉमीने कुलुप तोडून चोरट्यांनी आठ ते दहा हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. घरातील सामानाची स्थिती पाहता चोरटे घरात किमान दोन ते तीन तास थांबले असावेत. दरम्यान, पाटील यांच्या घराशेजारीही एका बंद घराचे कुलुप तोडण्यात आले आहे, त्यातील कोणतीही वस्तू चोरी झालेली नाही.
आनंद नगरातील स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला प्लॉट क्रमांक 29 मध्ये शोभा पाटील या एकट्याच राहतात. मुलगा चेतन मुंबईला प्राध्यापक आहे. गेल्या आठवड्यात दिवसापूर्वी शोभा पाटील यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. घरात कोणीच नसल्याने तब्येतीची काळजी घेण्यासाठी याच गल्लीत राहणारे भाऊ विनायक भगवान खडसे यांच्याकडे त्या दोन दिवसापासून थांबल्या होत्या, त्यामुळे घर बंद होते.
कुलुप तोडून केला घरात प्रवेश
शोभा पाटील या सकाळी साडे आठ वाजता घरी आल्या असता त्यांना दरवाजाचे कुलुप तुटलेले दिसले. तर घरातील मुख्य हॉलमधील 4 व बेडरुमधील दोन असे सहा लोखंडी कपाट तर किचनमधील लाकडी कपाट उघडे होते व त्यातील सामान बाहेर काढून फेकण्यात आला होता. बेडरुमधील कपाटात असलेल्या पाकीटातील अंदाजे आठ ते दहा हजार रुपये गायब झाले होते ते पाकीट हॉलमध्येच रिकामे पडलेले होते. यातच पाटील यांच्या घराशेजारीच असलेले बंद घर देखील चोरट्यांनी फोडले. मात्र, घरातून एकही वस्तु चोरीला गेलेली नाही.