पुणे, पिंपरी-चिंचवडकरांचा राजेशाही थाटात बाप्पांना निरोप
पुणे : विविध रंगी पोशाखातील ढोल पथकांचे तालबद्ध वादन, शहरातील सर्व मिरवणूक मार्गांवर काढलेल्या सुंदर रांगोळ्या, बाप्पा मोरयाचा जयघोष करणार्या गणेशभक्तांची अलोट गर्दी, क्रमाने निघालेल्या मानाच्या गणपतींच्या शिस्तबद्ध मिरवणुका आणि यास शतकोत्तर रौप्यमहोत्सवाची लाभलेली अभिमानास्पद झालर अशा राजेशाही थाटात आणि भावपूर्ण वातावरणात अनंत चतुर्दशीला पुणेकरांनी गणरायाला निरोप दिला. हा सोहळा अनुभवण्यासाठी केवळ राज्यातील नव्हे तर परदेशी पाहुण्यांनीही हजेरी लावली होती. तब्बल 28 तास 5 मिनिटे हा सोहळा सुरू होता. परंतु, शेवटच्या क्षणापर्यंत उत्साह, जल्लोष कायम होता. पिंपरी-चिंचवडकरांनीही गणरायांना भव्य मिरवणुका काढून अशाच प्रकारे भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. गणरायांच्या विसर्जनादरम्यान पाच जणांचे बळी गेल्याने मात्र हळहळ व्यक्त होत होती. हडपसरजवळील वाकडी येथे दोघा भावांचा तर आळंदीजवळ मरकळगावी एका 18 वर्षीय तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला. पिंपरीतील कस्पटे वस्ती येथे दोन मुलांचा विसर्जनादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनांनी या आनंद सोहळ्याला गालबोट लागले होते.
चैतन्यमय वातावरणात मिरवणुकांचा प्रारंभ
अत्यंत शांततेत निघालेल्या गणेश विसर्जनाची व सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाची शानदार सांगता झाली. मिरवणुकीचा प्रारंभ महात्मा फुले मंडई येथे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता झाला. मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची महापौर मुक्ता टिळक यांच्याहस्ते आरती करण्यात आली आणि मिरवणूक मार्गस्थ झाली. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आदी उपस्थित होते. रांगोळीच्या पायघड्या, सनई चौघड्याचे सूर, ढोल ताशाचा गजर यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.
मिरवणूक मार्गांवर प्रचंड गर्दी
गणेशोत्सवातील पहिले पाच दिवस पाऊस असल्याने मंडळांना विसर्जनाची तयारी करण्यात अडथळा येत होता. मात्र, त्यानंतर तीन दिवस सलग पावसाने उघडीप दिल्याने मिरवणुकीच्या तयारीला वेग आला होता. मिरवणुकीच्या प्रारंभापासून उत्साह होता तो 24 तास उलटून गेल्यावरही कायम होता. कडक उन्हातही मानाच्या पाच गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा अलोट गर्दी केली होती. सायंकाळी सातनंतर विद्युत रोषणाई केलेल्या मंडळांचे गणपती मुख्य मार्गावर आले आणि गर्दी आणखी वाढत गेली. मध्यरात्री लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्त्ता, केळकर रस्त्ता या सर्व मिरवणूक मार्गांवर प्रचंड गर्दी होती. मात्र बुधवारी पहाटे गर्दी ओसरली आणि दगडूशेठ गणपतीची मिरवणूक संपल्यावर रस्ते मोकळे झाले. रात्री 12 ते पहाटे 6 वाजेपर्यंत डीजेचा दणदणाट थांबला आणि सकाळी सहा वाजता पुन्हा सुरु झाला. आवाजाने मिरवणूक मार्गावर हादरे बसत होते, तर तरूणाईचा उत्साह आणि नाच यास उधाण आले होते.
सापत्नभावाबद्दल काही मंडळे नाराज
यंदाही मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत अंतर पडले. त्यामुळे अनेक मंडळे उशिरा मिरवणुकीत सामील झाली. नातूबाग मंडळाने विश्रामबाग वाड्यावरून मध्येच लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक आणली. ढोल ताशांचे खेळ सुरु केले. पोलिसांनी हस्तक्षेप करून ही मिरवणूक मागे नेली. मात्र यामध्ये एक तास वाया गेला. पोलिसांनी मनाच्या गणपती मंडळांना मुभा दिली; पण बुधवारी पहाटे अन्य मंडळांना जबरदस्तीने घाईने मिरवणूक न्यायला लावली. या सापत्नभावाबद्दल गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली.
श्री भाऊ रंगारी मंडळाची नाराजी
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या मुद्यावरून उत्सवाच्या आधीपासून वाद सुरू होता. त्याचे सावट मिरवणुकीवरही दिसून आले. गणेश मंडळाच्या स्वागतासाठी अलका चित्रपटगृहाजवळील टिळक चौकात महापालिकेचा मांडव होता, याठिकाणी श्री भाऊ रंगारी गणपतीचे स्वागत महापौर मुक्ता टिळक यांनी केले नाही, असा आरोप झाला. महापौर टिळक यांनी डावलले आणि घाणेरडे राजकारण केले अशी टीका श्री भाऊ रंगारी मंडळाचे सुरज रेणुसे यांनी केला. परंतु, काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी दुपारी श्री भाऊ रंगारी गणपतीची आरती केली. टिळकविरुध्द रंगारी असा हा वाद नाही हेही मंडळाने स्पष्ट केले.
मिरवणूक मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त
सर्व मिरवणूक मार्गांवर ढोल ताशा पथकांच्या वादनावर गणेशभक्तही ठेका धरताना दिसत होते. तरूणाईकडून ढोलताशा पथकांना उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळत होता. दगडूशेठ हलवाई गणपती आणि मंडई या दोनच गणपती मिरवणुकीत बँडपथके होती. मिरवणूक मार्गावर पोलिस बंदोबस्त चोख होता. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला या स्वत: देखरेख करत होत्या. मिरवणूक मार्ग आणि आसपासचे रस्ते येथील वाहतूक संचालन वाहतूक पोलिसांनी व्यवस्थित केल्याने लोकांची गैरसोय झाली नाही. वैद्यकीय मदत केंद्रे, फिरत्या रुग्णवाहिका तैनात होत्या. मिरवणूक संपताच महापालिकेच्या सफाई कर्मचार्यांनी रस्ते साफ केले.