दिल्लीत भाजपला मिळालेल्या यशात मोदी लाटेपेक्षा केजरीवाल आणि कंपूच्या करंटेपणाचा वाटा अधिक आहे. त्यामुळे खरेतर भाजपने केजरीवाल यांचेच अभिनंदन केले पाहिजे. सूर आणि लय हरवलेले काँग्रेस नेते दिल्लीतही भाजपला आव्हान निर्माण करू न शकल्यानेे एकहाती सामना जिंकण्याची आलेली संधी भाजपने साधली.
कोणताही पक्ष आणि नेता जनतेपासून लांब गेला किंवा दुरावला, की त्याची गलितगात्र अशीच अवस्था होते. हे या ताज्या निकालांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या आघाडीवर काँग्रेस आणि आप एकाच नावेचे प्रवासी ठरले आहेत. राजकारणात साधनसूचिता हवी, यात शंकाच नाही. परंतु, ती आणायची कशी यावरच मतभेद आहेत. याच साधनसूचितेचा मुद्दा पुढे करत केजरीवाल राजकारणात आले आहेत. मात्र, लोकासांगे ब्रह्मज्ञान असेच त्यांचे वर्तन राहिले आहे. आक्रमकपणा आणि आक्रस्ताळेपणा यात मूलभूत अंतर असते, हे केजरीवालांना उमगलेले तर नाही किंवा जाणूनबुजून त्यांनी ते जाणून घेतले नसावे. साधनसूचितेचा आग्रह धरणार्या नेत्याने दुसर्याचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी ठेवावी लागते. केजरीवाल यांनी स्वपक्षातल्याच नेत्यांचे म्हणणे कधी ऐकून घेतले नाही, तिथे अन्य पक्ष किंवा जनतेचे काही ऐकण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यामुळे आपही केजरीवाल केंद्रित झाला होता. साहजिकच अशा एककल्ली राजकारणाला जनताच सोडचिठी देते, या इतिहासाला दिल्लीच्या मतदारांनीही उजळणी दिली.
साधनसूचितेचा राग आळवणार्या केजरीवालांची साधनसूचिता किती होती, याचा पाढाच श्रृंगलू समितीने आपल्या अहवालात वाचला आहे. एकदा अभ्यासूंनी हा अहवाल वाचावा म्हणजे साधनसूचितेच्या नावाखाली किती भयंकर भंपकपणा हा कंपू करत होता, हे दिसून येईल. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका करण्याचा अधिकार केजरीवाल यांना जरूर आहे. याच टीकेला अनुषंगून जेटली यांनी केजरीवाल यांच्यावर अबू्रनुकसानीचा दावा दाखल केला आहे. दोन नेत्यांमधील या न्यायालयीन लढाईचा खर्चही या नेत्यांनीच उचलला पाहिजे. परंतु, आधुनिक सत्यवादी केजरीवाल यांनी समस्त करदात्या दिल्लीकरांवरच हा खर्च कसा लादला हे श्रृंगलू समितीने अहवालात दाखवून दिले आहे. दिल्लीचा विकास केंद्रातील मोदी सरकारेच रोखून धरल्याची टीका करणार्या केजरीवालांनी दिल्लीतील तिन्ही महापालिकांचा निधी का रोखून धरला, याचे स्पष्टीकरण आजतागायत दिलेले नाही. कदाचित, ही आपची राजकीय साधनसूचिता असावी, पण ती सामान्य दिल्लीकरांना मान्य होणारी नव्हती.
दिल्लीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर, मी दिल्ली सोडणार नाही, ही आपलीच राणा भीमदेवी गर्जना केजरीवाल अल्पावधीत विसरले. राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा नेता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेला मुरड न घालता आल्याने केजरीवालांवर सर्वत्रच पराभवाची नामुष्की ओढवली. आपल्याच चुकीमुळे आपण गोत्यात आलो आहोत, हे मान्य करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळेच आताही ते मतदान यंत्रांवरच खापर फोडून देशातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू पाहत आहेत. परंतु, त्यांच्याच पक्षाचे पंजाबातील खासदार भगवंत मान यांनी आपच्या चुकांमुळे झालेल्या पराभवाचे खापर यंत्रांवर फोडून चालणार नाही, असे सांगत केजरीवाल यांनाच घरचा आहेर दिला आहे.
दिल्लीतील आपचे अनेक नेते भ्रष्ट असल्याची प्रकरणे उजेडात आली आहेत. केजरीवाल यांनी या प्रकरणांतही बोटचेपी भूमिका घेतली. तसेच आपमधीलच अनेक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा जागृत झाल्याने पक्षात एकाच वेळी अनेक केजरीवाल निर्माण झाले. त्याचा परिणाम पक्षात अराजक माजण्यातच होणार होता. परिणामी, या अराजकास पुन्हा सत्तेवर आणण्याची चूक करण्याची दिल्लीकरांची तयारी नव्हती. त्याचे संकेतही दिल्लीकरांनी गेल्या काही काळात दिले होते. राजौरी गार्डनमधील नामुष्कीजनक पराभव ही त्याची एक झलक होती. अर्थात, तोपर्यंत वेळ गेलेली होती. पराभवाला सामोरे जाणे एवढेच काय ते केजरीवालांच्या हातात उरले होते.
आप काय किंवा काँग्रेस काय, सध्या या दोन्ही पक्षांना मोदीफोबिया झाला आहे. त्यामुळे ते केवळ मोदींना खुजे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून या दोन्ही पक्षांच्या हाती काहीच लागणार नाही. आपला पक्षच सक्षम पर्याय असल्याचे या पक्षांना दाखवून द्यावे लागेल. त्यासाठी ठोस कार्यक्रम देऊन पक्षसंघटना बळकट करणे व ती धडाडीने कामाला लावणे आवश्यक आहे. काँग्रेस किंवा आपमध्ये तसे काहीच घडत नसल्याने पुढच्या निवडणुकांतही पराभवापलीकडे या पक्षांच्या हाती काही लागणार नाही, हाच दिल्लीतील निकालाचा बोधही आहे.