‘आप’चा रिक्षाचालकांसाठी संघर्ष

0

पुणे । रिक्षाचालकांचे वेगवेगळे विषय हाती घेऊन आम आदमी पार्टीने पुण्यात जम बसवायला सुरुवात केली आहे. आम आदमी पार्टी रिक्षाचालक संघटना या नावाची नोंदणीकृत युनियन पक्षाने स्थापन केली आहे.

पुण्यात अनेक रिक्षा संघटना आहेत, मात्र राजकीय पक्षातर्फे अधिकृत युनियन चालविणारा पक्ष म्हणून आम आदमी पार्टी असेल. ओला कंपनीच्या रिक्षा व आम आदमी पार्टी यांच्यात नुकताच संघर्ष झाला. ओला कंपनीने 29 रुपयांत 4 किलोमीटर प्रवास अशा जाहिराती एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात लावल्या. ओलाकडे 10 टक्के रिक्षावाले नोंदवले आहेत, ओलाच्या दराने 90 टक्के रिक्षाचालकांचे नुकसान झाले, आरटीएने नमूद केलेल्या दरापेक्षा ओलाचे दर वेगळे आहेत याकारणाने आम आदमी पार्टीने आरटीओकडे तक्रार नोंदवली. आरटीओ खात्याकडून कारवाई न झाल्याने पक्षाने वारंवार निषेध नोंदविले. रिक्षाचालकांच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरल्याबद्दल पक्षाने आरटीओ अधिकार्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नुकतीच नोंदविली आहे.ओला किंवा उबेर कंपन्यांना ऑन द स्पॉट बुकिंग घेता येत नाही. तरीही कंपन्यांनी विमानतळ, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी बुकिंगसाठी केंद्रे काढली होती, याविरोधात आम आदमी पार्टीने तक्रारी केल्या आहेत. एवढ्यावर पक्ष थांबला नसून आगामी काळात रिक्षाचालकांसाठी परिवर्तन मेळावे घेणार आहेत. आम्ही भाडे नाकारणार नाही, नियमावलीचे पालन करू असे फलक आम आदमी पार्टी रिक्षाचालक संघटनेने लावले आहेत. याला प्रवासी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.