आपच्या लाभाचे पद प्रकरणात २७ आमदारांना क्लीन चीट

0

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या लाभाचे पद बाळगल्या प्रकरणात २७ आमदारांना मोठा दिलासा मिळाला असून निवडणूक आयोगाने आपच्या २७ आमदारांना क्लीन चीट दिली आहे. रोगी कल्याण समितीच्या अध्यक्षपदावरुन हे आमदार अडचणीत आले होते. आम आदमी पक्षाच्या २७ आमदारांकडे विविध रुग्णांलयातील रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्षपद होते. त्यामुळे या आमदारांच्या डोक्यावर सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार होती.

आम आदमी पक्षाच्या २७ आमदारांविरोधात विभोर आनंद या विद्यार्थ्याने या संदर्भात तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाने लाभाच्या पदाचा आरोप फेटाळून लावला आहे. दिल्लीच्या वेगवेगळया रुग्णलायात रोगी कल्याण समितीचे अध्यक्षपद या आमदारांकडे होते. केंद्र सरकारने २०१५ मध्ये घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आरोग्य मंत्री, स्थानिक खासदार, जिल्हा पंचायत सदस्य किंवा जिल्हाधिकारी यांनाच रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते. विभागीय आमदार फक्त या समितीचा सदस्य बनू शकतो पण आपच्या २७ आमदारांना अध्यक्षपदाबरोबर प्रत्येक रुग्णालयात कार्यालयाची जागा देण्यात आली होती. त्यावरुन हे पद लाभाच्या पदामध्ये मोडत असल्याचा आरोप करुन विभोर आनंद या विद्यार्थ्याने तक्रार केली होती. राष्ट्रपतींकडून हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले. निवडणूक आयोगाने या आमदारांना नोटीस बजावली होती.