जळगाव। माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे. आपण घेतलेल्या शिक्षणानुसार नोकरी आणि व्यवसायाची दिशा निश्चित करा. शिक्षणाच्या जोरावर आपला मार्ग निवडा. निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम बणून आपल्या जीवनाचे शिल्पकार व्हा, असा सल्ला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज पोलीस पाल्यांना दिला. जिल्हा पोलीस दल व जिल्हा कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त् विद्यमाने येथील मंगलम हॉल येथे जळगाव, धुळे, नंदूरबार येथील पोलीस पाल्यांसाठी रोजगार मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्याव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग, पोलीस उप अधिक्षक (मुख्यालय) रशीद तडवी, कौशल्य विकास विभागाच्या उपसंचालक श्रीमती अनिसा तडवी, श्री. खैरणार आदि उपस्थित होते.
राज्यभरातून आली पोलिस पाल्य : या रोजगार मेळयाव्यात बडोदा, पुणे, नागपूर, औरंगाबाद, व जळगाव येथील विविध कंपन्या सहभागी झाल्या असून या कंपन्यामध्ये रिक्त असलेल्या 232 विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी या रोजगार मेळयाव्यास बडोदा, पुणे, नागपूर, औरंगाबाद, व जळगाव येथून आलेल्या विविध कंपनीच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. मेळ्याव्यास नंदूरबार, धुळे, जळगाव जिल्हयांतील हजारो पोलीस पाल्यांनी हजेरी लावली. या पाल्यांच्या जेवण, राहण्याची व्यवस्था जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
इतर क्षेत्रातही नौकरी करा..
पोलीसांचे पाल्य म्हटले की, पोलीस भरती हे समीकरणच बनले आहे. पोलीसांच्या पाल्यांनी फक्त पोलीस भरती हेच उद्दिष्ट न ठेवता इतर क्षेत्रातही नोकरी व व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध आहे. या रोजगार मेळयाव्यामुळे आपणास दिशा मिळण्यास निश्चितच मदत होईल. तेव्हा आपण घेतलेल्या शिक्षणानुसार नोकरी व व्यवसाय निवडून निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम बनण्याचा सल्ला दिला.
स्पर्धेला तोंड द्यायला शिका
जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धेला तोंड द्यायला शिकले पाहिजे. यशस्वी व्हायचे असेल तर मन, मनगट आणि मेंदू खंबीर पाहिजे. पोलीसांच्या पाल्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मन, मनगट आणि मेंदू खंबीर ठेवून मार्ग निवडा, नक्की यशस्वी व्हाल. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.