नंदुरबार । आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून सतत संपर्कात रहावे, कुठल्याही परिस्थितीत आपत्तीमध्ये जीवत हानी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात नैसर्गिक जिल्हा आपत्तींना तोंड देण्यासाठी मान्सूनपूर्व तयारी करण्यासंदर्भात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी बोलत होते.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करा
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, प्रत्येक तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करुन प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर पावसाची आकडेवारी संकलीत करावी. प्रत्येक तालुकास्तरावर गावाचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्या बैठका घेवून यांचे संपर्क क्रमांक संपर्कासाठी संकलीत करावे. पूर प्रतिबंधक आराखडा, बिनतारी संदेश यंत्रणा, विज अटकाव यंत्रणा यासारख्या यंत्रणांनी सज्ज रहावे. जिल्हा परिषद शाळेच्या ज्या इमारती धोकेदायक आहेत त्यांची तपासणी करुन योग्य ती कार्यवाही करावी. शहरी भागातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापावित असे सांगून शोध व बचाव पथक,धरण नियंत्रण समन्वय अधिकारी यांची नियुक्ती आदी बाबींचा आढावा घेतला.
अधिकार्यांची उपस्थिती
बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष नागरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, शहाद्याचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धमेंद्र जैन, जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही. व्ही. बोरसे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.