धुळे । धुळे जिल्ह्यात 13 ऑक्टोबर 2017 रोजी आपत्ती निवारण दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त 9 ते 13 ऑक्टोबर 2017 या कालावधीत आपत्ती निवारण विषयक उपक्रम व रंगीत तालिमेचे (मॉक ड्रील) उपक्रम राबवावेत. त्याचे परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आपत्ती निवारण दिन साजरा करणेबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, अपर तहसीलदार ज्योती देवरे, इंडियन ऑइलचे शिरुड येथील व्यवस्थापक दिलीपसिंग गिरासे, राज्य आपत्ती दलाचे धुळे येथील संजय पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, 13 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्यानुसार प्रतिवर्षी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या दिवशी निरनिराळे आपत्ती निवारण विषयक उपक्रम घेवून व रंगीत तालिम राबवून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात यावे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अंतुर्लीकर यांनी सांगितले, आपत्ती धोके निवारण दिवस या वर्षी प्रथमच साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यात 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम होतील. त्यात प्रत्यक्ष रंगीत तालिमेचा समावेश असेल. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये निबंध, चित्रकला स्पर्धा होवून पथनाट्यांचे जनजागृतीसाठी आयोजन करण्यात येईल. त्यात 9 ऑक्टोबरला सोनगीर येथे महामार्गालगत पथनाट्याचा कार्यक्रम होईल. याच दिवशी साहूर, ता. शिंदखेडा येथे तापी नदी पात्रात रंगीत तालिम होईल. 11 ऑक्टोबरला तालुक्यातील शिरुड येथे कार्यक्रम होईल, तर 13 ऑक्टोबरला धुळे येथे मुख्य कार्यक्रम होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.