आपत्तीच्या वेळी वैद्यकीय अधिकार्यांचीच भासते मोठ्या प्रमाणात गरज
भुसावळ – मान्सुनपूर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून मंगळवारी सर्व अधिकार्यांची बैठक झाली.आपत्ती व्यवस्थापन काळात सर्वाधिक प्रमुख भूमिका वैद्यकीय विभागाची असतानाही व संबंधित अधिकार्यांना सूचित केल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी बैठकीला ‘खो’ दिल्याने संताप व आश्चर्य व्यक्त होत आहे. आपत्ती व्यवस्थापन बैठकीचे महत्व काय ? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात सतर्क राहण्याचे आवाहन
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीजनक नुकसान होते. अशा प्रसंगी जीवीतहानीचीही शक्यता असते. अशा प्रसंगावर मात करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून मान्सुनपूर्व व्यवस्थापनाची तयारी केली जाते. त्यानुसार भुसावळ तहासील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करून उपाय योजनांवर भर दिला जातो. यासाठी मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी तालुक्यातील नगरपालिका, महाराष्ट्र विद्युत कंपनी, नगरपालिका व तालुका वैद्यकीय अधिकारी, भारतीय दूरसंचार विभागातील अधिकार्यांची बैठक आयोजित केली जाते. त्यानुसार मंगळवारी तहसील कार्यालयात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी नाईकवाडे यांनी उपस्थित अधिकार्यांना आवश्यक सूचना दिली. शिवाय यावेळी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी विभागनिहाय कामांचा आढावा घेवून उपाय योजनांबाबत सुचना देतांना अतिवृष्टी दरम्यान नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आपत्ती जनक परीस्थिती निर्माण होवू शकते. अशा परिस्थितीत संबंधीत विभागांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
नगरपालिका प्रशासनाचेही टोचले कान
नगरपालिका प्रशासनाने आपल्या हद्दीतील लहान-मोठ्या गटारी, नाले, सार्वजनिक विहिरीतील गाळ काढून परीसर स्वच्छ ठेवावा, आपत्कालीन परीस्थितीप्रसंगी वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढावे त्याचप्रमाणे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी आणि दूरसंचार विभागांनाही आपत्कालीन परिस्थितीमध्ये सेवा खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली.
वैद्यकिय अधिकार्यांची बैठकीकडे पाठ
आपत्कालीन परीस्थितीमध्ये वैद्यकीय पथकाची महत्वाची भुमिका असते. यामुळे बैठकीला नगरपालिका व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना महसूल विभागाने बैठकीचे सुचना पत्र देवूनही दोन्ही विभागाच्या अधिकार्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली वैद्यकीय सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अतिवृष्टीदरम्यान साथीचे रोग पसरू नये यासाठी जनजागृती करणे, पाण्याचे नमुने व स्त्रोतांची माहिती घेवून उपाय योजना करणे, आपत्कालीन परीस्थितीत मुबलक प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध ठेवणे अशा विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना वैद्यकीय अधिकार्यांनी दाखवलेली एकूणच अनास्था संतापजनक असल्याची टीका होत आहे.
दांडी बहाद्दर अधिकार्यांवर कारवाई होणार
बैठकीच्या बाबतीत सर्व विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती मात्र सुचनेनंतरही अनुपस्थितीत राहणार्या अधिकारी व संबधीत विभागाच्या कर्मचार्यांना नोटीस बजावून योग्य ती कारवाई केली जाईल, असे नायब तहसीलदार संजय तायडे यांनी सांगितले.