पुणे । पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांची बैठक पार पडली. बैठकीत पावसाळ्यात उद्भवणारी परिस्थिती, त्याबाबत घ्यायची काळजी याबाबत सूचना देण्यात आल्या. बैठकीला जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रांत, तहसीलदार, ग्रामीण पोलीस अधीक्षक, शहर पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
बाधित गावांची यादी
जिल्ह्यातील सर्व धरणांचा सुरक्षिततेच्या दृष्टीने आढावा घेणे, धरणांमध्ये सध्या उपलब्ध पाणीसाठा, पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर करायच्या उपाययोजनांचा आराखडा निश्चित करणे, धरणातून पाण्याचा विसर्ग करताना नागरिकांना सतर्क करणे व याबाबत जिल्हा व तालुका नियंत्रण कक्षाला कळवणे, पूररेषा ठळक करून नदीपात्रातील गाळ काढणे, धरणाच्या खालील बाजूस असलेल्या आणि पुरामुळे संभाव्य बाधित गावांची यादी जिल्हा नियंत्रण कक्षाला देणे, अशा सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील जुने पूल, इमारती यांची बांधकाम तपासणी, आणीबाणीच्या वेळी उपयोगात येणारे बुलडोझर, झाडे कापण्याचे कटर, जनरेटर, आर.सी.सी कटर चालू स्थितीमध्ये ठेवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.
आरोग्य नियंत्रण स्वतंत्र कक्ष
पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य नियंत्रण स्वतंत्र कक्ष स्थापणे, रुग्णवाहिकांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना ससून सर्वोपचार रुग्णालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिल्या आहेत. पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानीचे मूल्य ठरवणे, शेतीच्या नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी तहसीलदारांच्या मदतीने पथकाची स्थापना करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली आहे. याबरोबरच जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, नागरी संरक्षण दल, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, औद्योगिक व आरोग्य सुरक्षा विभाग, हवामान खाते, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनादेखील सूचना देण्यात आल्या आहेत.
020-26123371वर संपर्क साधा
शहरासह जिल्ह्यात पावसामुळे पूरग्रस्त परिस्थिती ओढवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 020-26123371 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कक्षात दोन अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली असून विविध विभागातील कर्मचार्यांना काम वाटून देण्यात आले आहे.
पालक अधिकार्यांची नियुक्ती
पावसाळ्याच्या तोंडावर दुर्घटना घडू नये आणि कामे तत्काळ मार्गी लागावीत, यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालक अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. महापालिका मुख्य भवन आणि क्षेत्रीय कार्यालयात या अधिकार्यांमार्फत समन्वय साधण्याचे काम करण्यात येणार आहे. नालेसफाई, रस्त्यावर पाणी साठण्याचे प्रकार, राडारोडा, तुंबलेली गटारे, धोकादायक झाडे आदी कामांवर या अधिकार्यांची देखरेख राहणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी एका विभागप्रमुखाची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.