नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकांतील पराभवानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर पराभवाचे खापर फोडणारे पक्षाचे संस्थापक नेते कुमार विश्वास यांच्यापुढे अखेर आम आदमी पक्ष झुकला आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी पक्षाच्या लोकाधिकार समितीची (पीएसी) महत्वपूर्ण बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत पक्षातील उभी फूट टाळण्यासाठी मंथन झाले. त्यात कुमार विश्वास यांनी ठेवलेल्या सर्व अटी मान्य करत, केजरीवाल यांनी वादावर पडदा टाकला. त्यामुळे पक्षातील वादळ तूर्त शमले आहे. विश्वास यांनी राजस्थानच्या प्रभारीपदी नियुक्त करण्यात आले असून, ओखला येथील पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विश्वास हे भाजपचे एजंट असल्याचा आरोप आ. खान यांनी केला होता.
कुमार विश्वास यांच्या तीनही अटी मान्य
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून अरविंद केजरीवाल यांना हटवून कुमार विश्वास यांना नियुक्त करण्यासाठी आम आदमी पक्षातील एक गट सक्रीय झाला होता. त्यामुळे दिल्ली महानगरपालिका निवडणुकांतील पराभवानंतर विश्वास यांनी निवडणुकीतील पराभवाचे सर्व खापर केजरीवाल यांच्यावर फोडले होते. परिणामी, पक्षात दुफळी निर्माण झाली होती. त्यातच ओखला येथील पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी कुमार विश्वास हे भाजपचे एजंट असून, पक्ष फोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे केजरीवाल व विश्वास यांच्यात कमालीचे वितुष्ट आले होते. पक्षातील ही दुफळी मिटविण्यासाठी पक्षाचे मुख्य संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या उच्चाधिकारप्राप्त लोकलेखा समितीची (पीएसी) बैठक आपल्या निवासस्थानी बोलावली होती. या बैठकीला केजरीवाल यांच्यासह कुमार विश्वास, मनीष सिसोदिया, आशुतोष यांच्यासह वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. विश्वास यांच्या नाराजीवर या बैठकीत महामंथन झाले. तसेच, विश्वास यांनी मांडलेल्या तीन अटी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काय होत्या कुमार विश्वास यांच्या अटी
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड होता कामा नये, पक्षाच्या कार्यकर्त्यांशी सातत्याने संवादाची प्रक्रिया सुरु राहिली पाहिजे व त्यांच्या तक्रारी ऐकूण घेतल्या गेल्या पाहिजेत, तसेच राष्ट्रवादाशी जुळलेल्या कोणत्याही मुद्द्याशी तडजोड झालेली चालणार नाही. या अटी कुमार विश्वास यांनी ठेवल्या होत्या. पीएसीच्या बैठकीत या तीनही अटी मंजूर करण्यात आल्यात. बैठकीपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल रात्रीच कुमार विश्वास यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या एका गटाची बैठकही बुधवारी झाली होती. हा गट कुमार विश्वास यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आक्रमक झाला होता. केजरीवाल यांना हटवून विश्वास यांना मुख्यमंत्री करण्यात यावे, अशी या गटाची मागणी होती. आमदार अमानतुल्लाह खान यांनी सोमवारीच पक्षाच्या राजकीय समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी कुमार विश्वास हे रा. स्व. संघ व भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विश्वास यांनीही केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत, केजरीवालांभोवती खुशमस्कर्यांचे जाळे पसरले असल्याचा आरोप केला होता. तसेच, भावनिक होत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची धमकी दिली होती.