दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष 2019 मध्ये पुण्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आम आदमी पार्टी स्थापनेला 26 नोव्हेंबरला पाच वर्ष पूर्ण झाली. पुण्यात कार्यकर्त्यांनी, समर्थकांनीही उत्स्फूर्तपणे कार्यक्रम केले. दिल्लीतील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेणारे चित्रप्रदर्शन मांडले. महाराष्ट्रातील पक्षसंघटना बरखास्त करण्यात आली आहे. तरीही पक्षाचा वर्धापनदिन कार्यकर्त्यांनी चिकाटीने, निष्ठेने साजरा केला. या एका घटनेत पक्षातील स्पिरीट लक्षात येईल.
आम आदमी पार्टी हा पक्ष स्थापन झाला त्यावेळची राजकीय स्थिती खूप वेगळी होती. काँग्रेस आघाडी सरकारमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे देशभर टीकेचा विषय झाली होती. महाराष्ट्रात सिंचन घोटाळा, गुन्हेगारी, सत्ताधार्यांचे भ्रष्टाचार याने सामान्य माणसाच्या मनात राजकारणाविषयी घृणा निर्माण झाली होती. काँग्रेसविरोधी पक्षांवर भरवसा नव्हता. अशावेळी जात, पात, धर्म हे बाजूला ठेवून मूलभूत विकासाची भाषा करणारा, पारंपरिक राजकारणाला छेद देणारा पक्ष हवा होता. ती गरज आम आदमी पार्टीने भागविली. देशभर तरुणवर्गात उत्साह संचारला. या पक्षाचे सरकार दिल्लीत स्थापन झाले. पक्षाच्या सभांना गर्दी होऊ लागली. पण, काही मुद्द्यांवरून केजरीवाल यांनी राजीनामा दिला. ही त्यांची राजकीय घोडचूक ठरली. भाजपने या राजीनाम्याचे भांडवल केले. वेगाने चाललेल्या आम आदमी पार्टीला ब्रेक बसला. 2019 ची लोकसभा आम आदमी पक्षाने लढविली पण त्यांना अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. पुण्यातही पक्षाने सुभाष वारे यांना उमेदवारी दिली होती. त्यांची अनामत रक्कमही वाचू शकली नाही. त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. पक्ष त्यापासून दूर झाला. पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्राथमिक तयारी केली पण ऐनवेळी बाजूला राहण्याचा निर्णय पक्षाने घेतला.
गेल्या पाच वर्षात आदमी पार्टी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर असली तरी पक्ष कार्यकर्त्यांनी लोकांचे प्रश्न हाती घेतले. महापालिका आरोग्य सेवेवर अहवाल तयार केला आणि या गंभीर विषयाकडे पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. राईट टू एज्युकेशनसाठी लढे दिले. रिक्षाचालकांचे संघटन केले. विमा कंपन्यांवर अभ्यास केला आहे लवकरच यावरही पक्ष लढा देण्याच्या पवित्र्यात आहे. आरोग्य शिबीरेही घेतली जाणार आहेत.आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवाव्यात असा मतप्रवाह पक्षात जोर धरू लागला आहे. आगामी निवडणुका आम आदमी पार्टी विरूद्ध भाजप अशा होतील, असे विधान केजरीवाल यांनी केले. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. भाजपसाठी या घडामोडी लक्ष वेधणार्या आहेत. भाजपचे नेते जमिनीवर येऊन त्याची दखल घेतील का?
– राजेंद्र पंढरपुरे
9623442517