नवी दिल्ली : स्मार्टफोन वा इंटरनेटविना अगदी सुलभपणे ऑनलाईन कॅशलेस व्यवहार करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भीम अॅप’ सादर केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हे अॅप सादर करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या माध्यमातून भारतीय नागरिकांचा अंगठाच त्यांची बँक बनणार आहे. याचे अनावरण करतांना पंतप्रधानांनी हे अॅप जगासाठी आश्चर्य असेल असे प्रतिपादन केले. एके काळी अंगठा हे निरक्षरतेचे प्रतिक होते. मात्र आता अंगठा हीच ओळख बनणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी नमुद केले.
‘प्ले स्टोअर’वरून करा डाऊनलोड
भीप अॅप हे गुगलच्या प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्टॉल करावे लागेल. याच इंटरफेस हा इंग्रजी आणि हिंदी भाषेत देण्यात आलेला आहे. एखदा हे अॅप इन्टॉल केले की, कुणीही या माध्यमातून पैशांचे देवाण-घेवाण करू शकतील. या अॅपमध्ये संबंधीत युजरचा आधार क्रमांक आणि बँक खाते संलग्न करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये विविध सरकारी बँकांना संलग्न करण्यात आल्यामुळे देशभरातील नागरिक सहजपणे याचा लाभ घेऊ शकतील.
विरोधकांना उत्तर
नोटाबंदीमुळे पेटीएमसारख्या खासगी कंपन्यांना लाभ झाल्यामुळे यावरून विरोधकांनी सरकावर टिकेची झोड उठविली होती. विशेष करून पेटीएममध्ये असणार्या चिनी गुंतवणुकीवरून सोशल मीडियात खिल्ली उडविण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी पेमेंट प्रणाली सादर करून विरोधकांना उत्तर दिल्याचे मानले जात आहे. यात सरकारी बँका, आधार आदींना संलग्न करत पंतप्रधानांनी विरोधकांच्या आरोपांना वास्तववादी पर्यायाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. यासाठी त्यांनी बाबासाहेबांचे नाव घेऊन सामाजिक समीकरणही साधले आहे हे विशेष.
उंदीर शोधायचा होता
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी नोटाबंदीवरून विरोध करणार्यांना टोला मारला. पी. चिदंबरम यांच्यावरही मोदींनी नाव न घेता टीका केली.एक नेताजी बोलले होते की मोदींनी डोंगर पोखरून उंदीर काढला, पण असे उंदीरच शेतकर्यांचे सर्वाधिक नुकसान करतात. मला अर्थव्यवस्थेतले उंदीरच बाहेर काढायचे होते. असा टोला मोदींनी लगावला. या अॅपच्या रूपात आपण जनतेला नववर्षाची सर्वोत्तम भेट दिली आहे. आता नव्या वर्षात प्रत्येकाने किमात पाच व्यवहार तरी डिजिटल माध्यमातून करावेत, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले.