नवी दिल्ली । पंजाबमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम आदमी पक्शाल दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीतही सपाटून मार खावा लागला. या दोन पराभवामुळे आम आदमी पक्षाला आता शहाणपण सुचले असून त्यांना आता आम आदमीची आठवण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आपला भरघोस मतदान केले होते. पण हाच सामन्य माणूस आता दूर जात असल्याची जाणीव झाल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रत्येक दिवशी एक तास सामान्य जनतेला भेटण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय केजरीवाल यांनी त्यांच्या सर्व मंत्र्यांनादेखील नागरिकांना भेटण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीतील अपयश, निलंबित आमदार कपिल मिश्रा यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप यसगळ्या पार्श्वभूमिवर आम आदमी पक्षाने आता जनसंपर्कावर भर देण्याचे ठरवले आहे.
केजरीवाल यांच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना आता कुठल्याही पूर्वनियोजित सूचनेशिवाय आम आदमी पक्षाच्या सर्व मंत्र्याना भेटता येणार आहे. दर दिवशी सकाळी 10 ते 11 दरम्यान पक्षाचे मंत्री सर्वसामान्यांना भेटणार आहेत. ‘सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 11 या वेळेत कोणत्याही बैठका न घेण्याचे आदेश केजरीवाल यांनी सर्व अधिकार्यांना दिले आहेत. मंत्र्यांसोबतच अधिकार्यांनीदेखील बैठकांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.
दररोज भेटणार ‘मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल सोमवार ते शुक्रवारदरम्यान दररोज दिल्लीतील सर्वसामान्य जनतेची भेट घेणार आहेत. केजरीवालांचा हा जनता दरबार सचिवालयात असेल की कॅम्प ऑफिसमध्ये हे अद्याप निश्चित झालेले नाही,’ असे मनीष सिसोदिया यांनी सांगितले. ‘अनेक अधिकारी सर्वसामान्यांना भेटत नाही. लोकांसाठी उपलब्ध नसतात, अशा अनेक तक्रारी मला मिळाल्या आहेत,’ असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले आमदार कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. केजरीवाल मागील वर्षभरात अवघ्या दोन वेळा त्यांच्या कार्यालयात गेल्याचा आरोप मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. ‘केजरीवाल कोणतेही खाते नसलेले मुख्यमंत्री आहेत. केजरीवाल सर्वात कमी काम करुन सर्वाधिक सुट्ट्या घेतात. सर्वाधिक भ्रष्ट होण्याकडेदेखील केजरीवाल यांची वाटचाल सुरु आहे,’ असे म्हणत कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर शरसंधान साधले होते. आम आदमी पक्षाने काही दिवसांपूर्वी कपिल मिश्रा यांची हकालपट्टी केली आहे. कामगिरी चांगली नसल्याचे कारण देत मिश्रा यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मिश्रा यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.