विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संतुलित आहार प्रकल्प ः भाज्यांचे महिनाभराचे वेळापत्रक व मार्गदर्शन
जळगाव– विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने 1 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत संतुलित आहार प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांमध्ये संतुलित आहार या बद्दल जागरुकता व्हावी म्हणून संतुलित आहार प्रकल्प राबविण्यात येत आहे.
आजारांवर मात करण्यासाठी विद्यार्थी व पालक यांच्यात जनजागृती करण्याच्या उद्देशाने संतुलित आहार हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे प्राथमिक विभागातून लिना जोशी व माध्यमिक विभागातून संतोष चौधरी यांनी संपूर्ण नियोजन केले आहे. यासाठी त्यांना प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
संतुलित आहाराअभावी मुलांना जडतात विकार
सुदृढ शरीरात निरोगी मन वास करते असे म्हणतात. असे सुदृढ विद्यार्थी हे देशाची संपत्ती असतात. तर अशा सुदृढ विद्यार्थ्यांसाठी पोषक आहार, संतुलित आहाराचे महत्त्व या बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता असणे गरजेचे आहे. आजच्या परिस्थितीत विद्यार्थी जाहिरातींकडे जास्तीत जास्त आकर्षित होऊन जंक फुड अथवा फास्ट फुड याच्यावर भर वाढला आहे व त्यामुळे विद्यार्थ्यांना हवी असलेली पुरेशी पोषक तत्त्वे या अन्नातून मिळत नाहीत परिणामी विद्यार्थ्यांना पोषक तत्त्वांच्या अभावी वजन कमी होणे, मेंदुचा र्हास होणे, रोगप्रतीकारक शक्ती कमी होणे या सारखे गंभीर आजार उद्भवतात.
विद्यार्थ्यांच्या डब्यातील भाज्यांचे वेळापत्रक
तर अशा या प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थ्यांना दररोजच्या जेवणाच्या डब्याचे संपूर्ण महिनाभराचे वेळापत्रक देण्यात आले आहे. या वेळापत्रकात शरीरासाठी आवश्यक असे पोषक अन्न जसे की, सर्व प्रकारच्या डाळी, फळे, पालेभाज्या, कंदमुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज विविध आजार होण्यामागची कारणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संतुलित आहार या प्रकल्पात नर्सरी ते 10 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.