मुंबई (सुनील तर्फे )। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईला पालिका मूलभूत सेवासुविधा पुरवत आहे. मुंबई पालिकेची देशात श्रीमंत पालिका म्हणून ओळख आहे. ही पालिका मुंबईकरांना चांगल्या सेवा-सुविधा पुरवत असल्याने मुंबईकरांचे शिवसेनेवर प्रेम आहे. त्यामुळेच मुंबईकर या पालिकेवर भगवा फडकवत आहे. गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेना करून दाखवते म्हणूनच मुंबईकर शिवसेना पक्ष नंबर वनवर पाठवते. त्यामुळे मुंबईकरांचा हा विश्वास शिवसेना नक्कीच जिंकेल आणि मुंबईकरांना चांगल्या सेवा-सुविधा देण्यात येथील मुंबईकरांच्या हिताचे काम केले जाईल आणि मुंबईकरांसाठी विकास प्रकल्प प्रभावीपणे राबवून तसेच चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवून मुंबईचा कायापालट घडवण्याचा निर्धार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचननाम्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे महापौर महाडेश्वर यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना सांगितले.
देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्या मुंबई पालिकेच्या 76 व्या महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड झाली. निवडीनंतर मुंबईकरांना भेडसावणार्या प्रमुख नागरी समस्या, स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित मुंबई करण्यावर भर देणार आहेत. पाणी, रस्ते, शिक्षण, महिला सक्षमीकरण व सबळीकरण, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, कचरा समस्या, दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण, आरोग्य व्यवस्था व त्यावरील उपाययोजना, वाहतूककोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकारबाबत संयुक्त धोरण तयार करण्यासाठी नव्या दमाच्या महापौरांनी नवे व्हिजन आखले आहे. यामध्ये प्रामुख्याने कचरा व शिक्षण विभागावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. याबाबतही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपली मते मनमोकळेपणे मांडली.
मुंबईकरांसाठी नव्या योजना काय आहेत ?
महाडेश्वर – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबापुरीत मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे. या तरुणांसाठी प्रथम रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपला विचार आहे याकरिता कौशल्य विकास केंद्र सुरू करणार आहे. मर्यादित पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न, ठिकठिकाणी जाळण्यात येणार्या कचर्यामुळे कार्बन डायऑक्साईड, मिथेन यांसारख्या घातक वायू पसरतो. परिणामी, आरोग्य बिघडत असून दमा, अस्थमा, क्षयरोग अशा व्याधी जडतात. त्यामुळे असे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. त्या प्रभावीप्रमाणे राबवल्या जाणार आहेत. मुंबईकरांना भेडसावणार्या नागरी समस्यांचे निरसन करण्याचे काम आपण करणार आहे.
आपले मुंबईच्या विकासाचे व्हिजन काय आहे?
महाडेश्वर – पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने वचननामा जाहीर केला. त्यात मुंबईच्या विकासाचे व्हिजन आहे. त्यातील वचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. महापौर म्हणून त्यासाठी मी जातीनिशी प्रयत्न करणार आहे. मुंबईच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल. मुंबईकरांना चांगल्या नागरी सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न आपण करणार आहे. पालिका शाळांचा दर्जा घसरला आहे…
महाडेश्वर – पालिका शाळांचा दर्जा घडलेला नाही शाळेतील शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात आणि चांगली गुणवत्ता ठासून भरली आहे. मात्र, इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी लोकांना भुरळ घातल्याने पालकांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवली. प्रत्येकाला इंग्रजी येणे काळाची गरज आहे. परंतु, संस्कार, आकलन करण्याची क्षमता ही मातृभाषेतील शिक्षणामुळेच वाढते. शिवाय घोकंमपट्टीही करता येत नाही. त्यामुळे पालकांनी मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण देण्यावर भर द्यावा. राज्य शिक्षण विभागाच्या पहिली ते सातवीपर्यंत उत्तीर्ण धोरणामुळे अनेक परीक्षा बंद झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन करण्याच्या सवयी सोडून दिल्या आहेत. याबाबत राज्य सरकारकडे आपण लवकरच पाठपुरावा करणार आहे. मुलांना वाचन, लेखन येणे गरजेचे आहे, तरच विद्यार्थी हुशार होऊ शकतो
मुंबईकरांना 24 तास पाणी केव्हा मिळणार?
महाडेश्वर – मुंबईत सुमारे दीड कोटी जनता राहत आहे. या सर्व मुंबईकरांना सर्वात शुद्ध पाणीपुरवठा करणारी मुंबई पालिका आहे. त्यासाठी पालिका जल विभाग रात्रंदिवस राबत आहे. काहीवेळी खोदकामुळे जलवाईन्या मोठ्या प्रमाणात फुटत असतात. त्यामुळे परिणामी, दूषित पाणी येते. पाण्याचे स्रोत मर्यादित आहेत. त्यामुळे भविष्याकरिता पाणी धोरण आखले असून सुमद्राचे खारेपाणी गोड करण्याच्या दृष्टीने नव्या टेक्नोलॉजीचा वापर लवकरच करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, ही बाब खर्चीक असल्याने थोडासा उशीर होणार आहे, पण टेक्नोलॉजी तयार करून ठेवण्यात येणार आहे. भविष्यात पाणीटंचाई भासल्यास याचा लगेच उपयोग केला जाईल.
मुलुंड, कांजूरमधील डम्पिंगला मोठा विरोध आहे
महाडेश्वर – मुंबईत दररोज साधारण नऊ टन कचरा गोळा केला जातो. या दिवसेंदिवस वाढणार्या कचर्याची समस्या आता कमी करण्यासाठी सेंद्रिय खत व वीज निर्मितीचे प्रयोग पालिकेकडून केले जात आहेत. कुपर रुग्णालय परिसरात पालिकेने गांडूळखत प्रकल्प सुरू केला आहे. झोपडपट्टी किंवा सोसायट्यांमध्ये राहणार्या नागरिकांनी असे प्रकल्प राबवण्यास पुढाकार घ्यावा. असे आवाहन करत लोकसहभागामुळे कचरा समस्या कमी होण्यास मदत होईल.आणि कचरा समस्येबाबत दर महिन्याला पालिका अधिकार्यांची आयुक्तांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक घेण्यावर भर दिला जाईल
पालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांवरील भार आहे
महाडेश्वर – मुंबई पालिका ही कमी दरात सेवा देत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिका रुग्णालयात डॉक्टरही चांगले असल्याने उपचार पद्धती चांगल्याप्रकारे होत आहेत. त्यामुळे मुंबईबाहेरून येणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे. रुग्णसेवेसाठी पालिका रुग्णालय नेहमीच तयार असतात. केईएम, नायर आणि लोकमान्य टिळक शीव रुग्णालयासह पालिकेने कुपर रुग्णालय नवे अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध केले आहे. शिवाय रुग्णाला त्वरित उपचार मिळावेत, यासाठी जीवन वाहिन्या सुरू करण्याचा मानस आहे. येत्या काही दिवसांत शहरापासून उपनगरापर्यंत जीवनवाहिन्या उपलब्ध केल्या जाणार आहेत आणि उपचार पद्धती अधिक कशा गतिमान होतील, याकडे भर दिला जाणार आहे
पालिकेत पहारेकर्याची भूमिका बजवणार आहेत.
महाडेश्वर – भाजपचा आव्हान पेलण्यासाठी कोणत्याही क्लृप्त्या लढवण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमच्या समोर कोणाचेही आव्हान राहणार नाही.