मुंबई (राजा आदाटे)। माणसाची सावली आयुष्यभर त्याची साथ सोडत नाही, असे म्हणतात. म्हणूनच तर मी सावली सारखी तुझ्या पाठिशी उभी राहील, मायेची सावली, अशी वाक्ये प्रसिध्द झाली. मात्र हीच सावली काही क्षणासाठी आपली साथ सोडते हेही सत्य आहे. त्याचा वैज्ञानिक आधार आहे. आणि ते घडणार आहे, याच महिन्यात. आपण प्रत्यक्ष अनुभव घेवून पहाच.
वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो
पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे.
महाराष्ट्रातील या तारखांना अनुभव घ्या
7 मे कोल्हापूर, मिरज, सांगली. 10 मे सातारा, अक्कलकोट. 11 मे वाई, महाबळेश्वर. 12 मे बार्शी, बारामती, 13 मे लातूर. 14 मे अलिबाग, दौंड, पुणे. 15 मे मुंबई. 16 मे नगर, कल्याण, नांदेड, ठाणे. 18 मे पैठण. 19 मे – जालना. 20 मे औरंगाबाद, नाशिक. 21 मे मनमाड. 22 मे यवतमाळ. 23 मे बुलडाणा, मालेगाव. 24 मे अकोला. 25 मे अमरावती. 26 मे भुसावळ, जळगाव, नागपूर.
खगोलशास्त्रीय घटना
हा दैवी चमत्कार नव्हे तर ही खगोलशास्त्रीय घटना आहे. वर्षातून दोनदा हा प्रकार घडतो. आपण दिलेल्या तारखांना त्या स्थळी हा प्रकार स्वतः अनूभव घेवून पाहू शकता.
– श्रीनिवास औंधकर, संचालक, खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्र