आपले नागरिकशास्त्र अद्याप कच्चेच!

0

राज्यात आणि देशात रस्ते अपघातांचे वाढणारे प्रमाण खरोखरच चिंताजनक आहे. सरकारी अहवालांचे एकवेळ सोडून देऊ. पण, या अपघातांतून आपण काहीच का शिकत नाही? नागरिकशास्त्र या विषयात आपण समाज म्हणून अद्याप ‘ढ’ असल्याचेच हे अपघात सांगत आहेत. नव्या वर्षांत हा विषय चांगल्या गुणांनी आत्मसात करण्याचा संकल्प करायला काय हरकत आहे?

पूर्वी इतिहासाबरोबर नागरिकशास्त्र नावाचा एक विषय अभ्यासक्रमात सहभागी असायचा. प्रत्येकाच्या आवडी-निवडी भिन्न असतात. पण, नागरिकशास्त्र हा विषय आवडतो, असे म्हणणारा एकही बहाद्दर मला कधी सापडलाच नाही. नागरिकांचे मूलभूत हक्क, कर्तव्यं आदी गोष्टींचा अंतर्भव असणारा हा विषय समाज म्हणून आपण पूर्वीही ऑप्शनला टाकला होता आणि त्याकडे आजही फारशा गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे आपला सगळाच गोंधळ उडतोय. आपण फक्त आपल्या हक्क्यांविषयी बोलतो. पण, कर्तव्यांचं नावही घेत नाही, अशी काहीशी चमत्कारिक स्थिती आहे.

या सगळ्याचं स्मरण होण्याचं कारण काय, असा प्रश्‍न कोणालाही पडेल. पण, अलीकडच्या काळात देशात आणि राज्यात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलयं. मी हे म्हणतोय ते कोणत्या सरकारी अहवालातली माहिती देण्यासाठी म्हणून नव्हे. असा एकही दिवस आपल्याला आठवणार नाही की, ज्यात अशा अपघाताची बातमी वाचली किंवा ऐकली नसेल. बरे फक्त महामार्गांवरच अपघात होतात म्हणावे, तर तसेही नाही. थोड्या आडबाजूच्या गावाकडं जाणार्‍या रस्त्यांवरही ते होतात. हे असं का होतं? आपलं नेमकं काय चुकतं? मुळात हा प्रश्‍नच पडत नाही, मग उत्तर शोधण्याची तसदी तरी कोण घेणार!

राज्यातले महामार्ग किंवा मोठे रस्ते शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारले गेलेले नाहीत. रस्त्यांवर अपघात होऊ नयेत म्हणून पूरक अशा सुविधा अद्यापही उभारल्या गेलेल्या नाहीत, असे अनेक मान्यवर सांगतात. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचेही असेच मत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कशा स्वरुपाच्या सोयी-सुविधा असणे गरजेचे आहे, यावर आतापर्यंत असंख्य वेळा चर्चा झाली आहे. या तज्ज्ञांचे म्हणणे बरोबरही आहे. मग प्रश्‍न असा पडतो की, एखाद्या गावात किंवा शहरात होणार्‍या अपघातांचे काय?

या अपघातांची कारणमीमांसा जरा अधिक चिकित्सकपणे आपण केली पाहिजे. त्यातही मानवी चुकांमुळेे होणार्‍या अपघातांचे काय? नागरिकशास्त्र येते ते इथे. वाहन कसे चालवले पाहिजे? याचे जगभरात पाळले जाणारे संकेत आणि नियम एकच आहेत आणि आपल्याकडेही तेच लागू आहेत. कोणते वाहन, कुठे आणि कसे चालवायचे? वाहनाचा वेग कुठे आणि किती असला पाहिजे? किती वर्षांनंतर कोणते वाहन चालवण्याची परवानगी द्यायची? वाहन चालवताना वाहनचालकाची स्थिती व मनस्थिती कशी असली पाहिजे? वगैरे अनेक नियम आपल्याकडेही आहेतच. या नियमांचे उल्लंघन झाले तर दंडसंहितेनुसार शिक्षाही होऊ शकते. हे नियम आपण पाळतो का? याचे सरळ उत्तर नाही, असे आहे.

मद्यपान करून वाहन चालवू नये, असा एक नियम आहे. हा नियम मोडून अनेकांना चिरडल्याची प्रकरणे आपण वाचली आहेतच. यात कोणाचेच नाव घ्यायची गरज नाही. पण, अशा अपघातांना काय म्हणायचे? प्रचंड वेगात वाहन चालवण्यामुळेही अपघात घडले आहेत. यात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक तर अशी वाहने रस्ता सोडून भरकटतात आणि कुठे तरी धडकतात किंवा ती सरळ समोरून येणार्‍या किंवा समोर जाणार्‍या वाहनांवर जाऊन आदळतात तरी. शहरात किंवा गावात चुकीच्या बाजूने वाहने चालवली जातात. एकेरी वाहतुकीतही वाहने चुकीच्या पद्धतीने घातली जातात. हे सगळे आपले नागरिकशा? कच्चे असल्याचेच पुरावे आहेत. पुण्यात गाडी चालवून दाखवा राव. मग, तुम्हाला जगात कुठेही चालवता येईल, असे पुणेकर थट्टेने म्हणतात. पण, आता अशी थट्टा ही फक्त पुणेकरांची मक्तेदारी राहिलेली नाही. राज्यातल्या अनेक गावांत, शहरांत अशीच परिस्थिती दिसते आहे. वाहन चालवणे हे हत्यार चालवण्यासारखे जिवावर बेतणारे ठरते आहे आणि ही काही फार चांगली गोष्ट नक्कीच नाही. हेे असं का होतं आहे? रस्ते खराब म्हणून अपघात आणि गुळगुळीत रस्त्यांवरही अपघातच? आपलंही कुठंतरी, काही तरी चुकतयं गड्या. आपण आपल्या आणि दुसर्‍यांच्या जीवाची फिकीरच करत नाही की काय? थोडं थांबून आपण आपलंच विश्‍लेषण करायला हवंय. तसं थांबण्याची आपली तयारी नाही. अगदी रस्त्यावर आणि मनातल्या मनातही! वाहतुकीचे नियम पाळणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, असं नागरिकशास्त्र सांगतं.

आपण आपल्या आणि दुसर्‍यांच्या जीवासाठी एवढं कर्तव्य तरी बजावलंच पाहिजे. मानवी चुकांमुळे अपघातांत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांकडे एकदा पाहुया. आपलाच जीव गलबलेल. त्यांच्या व्यथा ऐकल्या तरी आपलाही जीव कासावीस होईल. आपल्यावर असं संकट आलं तर, या कल्पनेनंही मन कसं कावरंबावरं होतं. म्हणूनच एक आवाहन करावसं वाटतं की, नव्या वर्षाचा आपण हाच संकल्प करू. आपलं नागरिकशास्त्र जरा पक्क करूया. त्यामुळेे अनेकानेक अपघात आपण आपल्याच पातळीवर टाळू शकू. मग उर्वरित गोष्टींसाठी सरकारशी भांडण करता येईलच की!

दृष्टिकोन – गोपाळ जोशी
9922421535