स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्यावतीने व्याख्यानमालेचे आयोजन
निगडी : राजकीय लोकशाही जरी या सत्तर वर्षांपासून प्रस्थापित झाली असली तरी अगदी प्राचीन काळापासून धार्मिक लोकशाही हिंदुस्थानात अस्तित्वात आहे. स्वामी विवेकानंदांनीदेखील या गोष्टीचे समर्थन केले होते. मातृसत्ताक-पितृसत्ताक पद्धतीपासून ते तात्त्विक पातळीवर वैविध्य आपल्या देशात आहे. मतभेदाला हिंदुस्थान कधीही घाबरला नाही. खंडण-मंडण, चर्चा, चिंतन हा भारतीयांचा स्वभावधर्म आहे. मतभिन्नता प्रकट करणे हेच व्याख्यानमालांचे मूळ आहे. व्याख्यानमालांच्या माध्यमातून आपले राष्ट्रीयत्व ऊर्जितावस्थेत आले पाहिजे, असे मत सामाजिक समरसता मंचाचे प्रा. रमेश पांडव यांनी येथे व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रचार विभाग (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने कॅप्टन जी. एस. कदम सभागृह येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय व्याख्यानमाला संयोजक परिषदेत मार्गदर्शन करताना प्रा. रमेश पांडव बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ व्याख्याते भागवताचार्य वा. ना. उत्पात, प्रा.शैलजा सांगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विलास लांडगे, राजेंद्र घावटे आदी उपस्थित होते.
तत्वांचे वावडे नसावे
प्रा. रमेश पांडव पुढे म्हणाले की, हिंदू धर्म, हिंदू समाज परिवर्तनशील आहे. त्यामुळे व्याख्यानमालांना कोणत्याही विषयांचे, तत्त्वांचे वावडे असता कामा नये. ज्याप्रमाणे हिंदूधर्म नेहमी परिवर्तनशील राहिला त्याचप्रमाणे अन्य धर्माचीही चिकित्सा होणे आवश्यक आहे. लव जिहाद, असहिष्णुता या गोष्टींचे समर्थन करण्या पेक्षा त्यांचे विश्लेषण म्हणूनच अनिवार्य आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि पूर्वेकडे आसाममध्ये लाचिम बड फुकन यांनी सामान्यजनांमध्ये राष्ट्रीय भावनांचे पुनरुत्थान केले तेच कार्य आज व्याख्यानमालांच्या माध्यमातून झाले पाहिजे.
व्याख्यानमालेत तरुणांचा सहभाग, नियोजनाची प्रक्रिया, सामाजिक घटकांचा समावेश, वक्ते आणि व्याख्यानविषयांची निश्चिती, स्थान आणि कालावधी, आर्थिक नियोजन अशा विविध बाबींवर सहभागी प्रतिनिधींनी आपले अनुभव कथन केले. समारोप सत्रात सहभागी प्रतिनिधींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. रमाकांत मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. भास्कर रिकामे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने परिषदेची सांगता झाली.