‘आपले सरकार’वर देणार कर्जमाफीच्या शेतकऱ्यांची यादी

0

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर रकमेच्या आतापर्यंत अंतिमरित्या मंजुरी दिलेल्या खातेदारांची यादी राज्य शासनाच्या ‘आपले सरकार पोर्टल’वर मराठी भाषेत उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी अंतिमरित्या मंजुरी दिलेल्या लाभार्थ्यांची यादी शासनातर्फे काल विधानमंडळाच्या सदस्यांना पेन ड्राईव्हमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली. त्यावर ही माहिती मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ‘आपले सरकार वेबपोर्टल’वर उपलब्ध करुन देण्याची मागणी सदस्य जयंत पाटील यांनी केली. त्यास उत्तर देताना फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले, राज्यातील बँकांकडून सध्या प्राप्त झालेली माहिती इंग्रजीमध्ये असून बँकनिहाय आहे. या यादीमध्ये एका तालुक्यातील बँकेच्या शाखेने दुसऱ्या तालुक्यातील शेतकरी खातेदारासही पीककर्ज दिलेले असू शकते. या दोन बाबी पाहता शेतकऱ्याला आपले नाव यादीमध्ये शोधताना अडचण येऊ शकते. यामुळे राज्य शासन लवकरच ही यादी मराठीमध्ये भाषांतरीत करुन तालुकानिहाय तयार करेल आणि ‘आपले सरकार वेबपोर्टल’वर उपलब्ध करुन देईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.