हजारो वर्ष अस्पृष्यतेच्या व गुलामगीरीच्या खाईत. लोटल्या जावून, गाडले गेलेल्या व ह्या गाडलेपणाला पर्याय नाही अशी समजूत केलेल्या. आपल्या पददलित बांधवांमध्ये स्फुलींग चेतवितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा. आपल्याला शासनकर्ती जमात व्हायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 126 वी जयंती त्यानिमित्त त्यांना त्यांच्या क्रांतिकारी विचारांना, त्यांनी केलेल्या महान कार्याला विनम्र अभिवादन…
14 एप्रिल 1891 साली माता भिमाईच्या पोटी भिमरायांचा जन्म झाला. आपल्या पोटी जन्माला आलेल्या महामानवाला महामानव म्हणून घडविणे. संस्कार आणि कर्तव्यांची जाण करून देणे. हे एक असामान्य कर्तव्य आहे. महान कर्तव्य आहे. ते कर्तव्य पिता सुभेदार रामजी बाबा. महामाता भिमाई यांनी पार पाडले. समाजासाठी लढत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ढाल-तलवारीसारखी साथ देणार्या त्यागमुर्ती माता रमाई यांच्यामुळेच बाबासाहेबांना समाजाच्या उद्धारासाठी संघर्ष करण्याची उमेद मिळाली. भारतात अनेक राष्ट्रपुरुष होवून गेले. अनेकांनी देशासाठी आहुती दिली. कुणी राजकीय स्वातंत्र्यासाठी लढले तर कुणी सामाजिक स्वातंत्र्यासाठी झटले. काही राष्ट्रपुरुषांनी या देशावर अधिराज्य करणार्या शक्तीविरुद्ध बंड पुकारले परंतू राजकीय आणि सामाजिक, मानसिक स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण जीवन ज्यांनी व्यतित केले ते म्हणजे विश्वरत्न, युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
जगाच्या पाठीवर अनेक धर्म आहेत. भिन्न विचार प्रवाह आहेत. मात्र धर्म माणसासाठी असल्यापेक्षा माणूस धर्मासाठी असल्याचे प्रतिपादन करणारे, माणसाला केंद्रबिंदु मानणार्या, विचारांचे मुक्त स्वातंत्र्य बहाल करणार्या विज्ञानवादी, मानवतावादी विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. शुद्र मानल्या गेलेल्या जातीवर होणारे अत्याचार याबाबत त्यांच्या मनात विलक्षण चिड होती. आपण माणूस आहोत आणि मानव म्हणून या जगात जगण्याचा आपल्याला इतरांप्रमाणे नैसर्गिक, मानवी व मुलभुत हक्क आहे. यांची जाणीव विषमतेच्या खोल खाईत अडकलेल्या दिन दलितांना करुन दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यभराचा संघर्ष हा समता, स्वातंत्र, बंधूभाव व न्यायतत्वावर आधारीत नवभारताची निर्मिती करण्यासाठीच होता. त्यासाठी त्यांनी सामाजिक परिवर्तनाची चळवळ चालवितांना विविध आंदोलने व सत्याग्रह केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य केवळ विशिष्ट वर्गाच्याच हिताचे नव्हे तर संपूर्ण भारताच्या हिताचे होते. देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी बाबासाहेबांनी स्वतःच्या आरोग्याचीही तमा न बाळगता अहोरात्र कष्ट उपसले. समता, स्वातंत्र, बंधुता व न्याय यावर आधारलेली लोकशाहीवादी भारतीय संविधानाची निर्मिती केली. त्यामुळेच भारताची गणना जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही राष्ट्रांमध्ये होऊ लागली. म्हणून डॉ. आंबेडकरांचे देश कार्य आणि देशहित हे हजारो मैलांपर्यंत भविष्याचा वेध घेणारे होते. याची प्रचिता आता बर्याच उदाहरणांवरून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सगळेच मानतात परंतु त्यांना मानण्यापेक्षा त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. त्यांचे विचार, आचार बुद्धीमत्तेला समजून घेणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फार महत्त्वकांशी होते. माणसामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे कार्य करते मानवाचा धार्मिक, सामाजिक, शारिरीक, मानसिक विकास हा शिक्षणाशिवाय पुर्ण होऊच शकत नाही, त्यामुळेच आपल्या शालेय जीवनात 18/18 तास अभ्यास करणारे डॉ. आंबेडकर हे शिक्षणाचे महत्त्व चांगल्याप्रकारे ओळखून होते. शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई येथे 1946 साली सिद्धार्थ महाविद्यालयाची तर 1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या महान व्यक्तीमत्वासारखे कोणी झाले नाही होणार नाही, त्यामुळेच बाबासाहेबांच्या जयंतीच्या माध्यमातून एक वैचारिक क्रांती जन्म घेते.
– सुषलर भालेराव
9860074600