पुणे । पडद्यामागील कलाकार हे चित्रपटसृष्टीचे पाया आहे. आयुष्य घडत असताना एवढी ही चांगले बनू नका की तुम्ही देव बनाल आणि एवढी ही वाईट बनू नका की तुम्ही सैतान बनाल. माणूस बना. आपले जीवन झाडासारखे आहे. चांगली फळे हवी असतील तर मुळे खोलवर रुजावी लागतात. त्यासाठी आपल्या मातीशी व कामाशी प्रामाणिक रहा. पडद्यामागील कलाकारांनी आकाशाकडे झेपावताना पाय जमिनीवरती ठेवायला पाहिजेत, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केली.कलासंस्कृती परिवारतर्फे कला क्षेत्रातील योगदानासाठी जॅकी श्रॉफ यांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते ‘कला-कृतज्ञता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कलासंस्कृती परिवारचे वैभव जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
जॅकी श्रॉफ म्हणाले, जमिनीवर राहिला तर आपल्याला खरी माणसे कळतील. त्यासाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांचे दुख समजून घेतले पाहिजे. पउद्यामागे काम करणार्या तंत्रज्ञ आणि कलाकारांसाठी विमा योजना, निवृत्ती वेतन, त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय केली पाहिजे. विक्रम गोखले म्हणाले, पडद्यावर असो की पडद्यामागे जॅकी श्रॉफ यांनी कधीही कलाकार आणि कामगारांमध्ये भेदभाव केला नाही. त्यांच्यातील कलाकाराप्रमाणे माणूसही अद्याप जिवंत असल्यानेच ते अनेकांना आपलेसे वाटतात. विशेष पोलिस महानिरिक्षक विठ्ठल जाधव प्रशासकीय अधिकारी व्ही. एम म्हस्के, माजी उपमहापौर दीपक मानकर यांना यावेळी ‘निकोप सेवा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. र्बार्स टोन टेलिव्हीजन प्रा. लि. (कॅमेरा, लाईट्स, साऊंड, एडिटिंग सेवा), लक्ष्मण जानवेकर, (चित्रपटांचे बॅनर) उत्कृष्ट प्रसिद्धी प्रमुख (जनसंपर्क मीडिया) रामकुमार शेडगे, रामू सिंग (चित्रीकरणांसाठी खानपान सेवा) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सौरभ गोखले, विजय पटवर्धन, सिद्धेश्वर झाडबुके यांनी सूत्रसंचालन केले.