आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा अनादर करणारी मुले करंटेच

0

भुसावळ। ज्या घरात वृद्ध माणसे नाहीत ती घरे नाहीत, तर निव्वळ भिंती आहेत. जेष्ठाच्या संस्काराच्या शिदोरीवरच आपण मार्गस्थ होत आहे, तेव्हा आई वडिलांचा जर कोणी अनादर करत असेल तर ते माझ्या दृष्टीने करंटे आहेत, असे परखड मत प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी व्यक्त केले. गणेश कॉलनी व परिसर जेष्ठ नागरिक संघाची गेल्या वर्षी गुढीपाडवाच्या दिवशी स्थापना झाली होती. प्रथम वर्धापनदिनानिमित्त जळगाव रोड जवळील महादेव मंदिरात व्याखान आयोजित केले होते.

शहराला गतवैभव प्राप्त करण्यासाठी जेष्ठाचा अनुभवाचा फायदा घ्यावा
यावेळी प्रा. लेकुरवाळे म्हणाले कि, समाजातील जेष्ठ नागरिक हे अखंड उर्जेचे स्तोत्र आहेत. आज तुमची हाडे ठिसूळ असतील पण तुम्ही मनाने आणि विचाराने नक्कीच तरुण आहात भुसावळ शहराला गत वैभव प्राप्त करावयाचे असेल तर नक्कीच जेष्ठाचा अनुभवाचा फायदा व्हायला हवा पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, हे भुसावळकराचे दुर्भाग्य आहे. तुमचा आशीर्वादाचा हात, मार्गदर्शनाचे बोट आणि डोळ्यातील धाक हि यशाची त्रिसूत्री असून तुम्ही जर ती नीट अमलात आणली तर नक्कीच ह्या शहराची दशा आणि दिशा बदलेल असे सांगितले.

भावसार यांचा करण्यात आला सत्कार
संघातील वर्षभर सक्रीय कार्यरत राहणारे जेष्ठ नागरिक यमासा भिकुसा भावसार यांचा जेष्ठ नागरिक भुषण असा सम्मान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. के. नारखेडे विद्यालय संचालित एनटीएस परीक्षेत जिल्ह्यामधून सोहम ललित बहाले प्रथम आला, म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला. संघातील वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व जेष्ठ नागरिकांचा देखील सत्कार करण्यात आला.

आरोग्यावर उपक्रम राबविणार
दरम्यान शहरात वाचन कट्टे निर्माण करण्याची क्षमता ही, जेष्ठांमध्येच आहे तेव्हा आपल्या आयुष्याची हि नवी पहाट असल्याचेही प्रा. लेकुरवाळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत गीत यमासा भावसार, संघाचा वार्षिक अहवाल धनराज पाटील, व्यक्ती परिचय डॉ.नितु पाटील, आभार प्रदर्शन प्रभाकर झांबरे तर सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले. यावेळी जेष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. जेष्ठ नागरिक संघात आगामी काळात फक्त आरोग्य विषयक उपक्रम, व्याख्यान, आरोग्य शिबीर, चर्चा सत्र, तपासणी शिबीर आदी व्यापक प्रमाणात राबवून पुढील वर्ष हे आरोग्य विशेष वर्ष – 2017 म्हणून साजरे करणार असल्याचे डॉ. नितु पाटील यांनी सांगितले.