आपापल्या क्षेत्रात नाविन्याचा शोध घ्या : रवी परांजपे

0

पुणे । तरुणांनी नवीन मार्ग चोखाळत, पारंपारिक कला जोपासून त्या समृद्ध करण्याचे आव्हान स्वीकारायला हवे. याबरोबरच आपापल्या क्षेत्रात नाविन्याचा शोध घ्यायला हवा, असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

चित्रकार साहिल परांजपे यांनी साकारलेल्या थ्रेड आर्ट ऑन वूडन प्लँक आणि वॉटर कलर पेंटिंग्जच्या प्रदर्शनाचे उद्घाटन रवी परांजपे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. मॉडेल कॉलनी येथील द रवी परांजपे स्टुडिओ येथे रविवार (दि. 20) पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 दरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य राहणार आहे. यावेळी पुष्पाताई परांजपे, श्रीकांत परांजपे, वर्षा परांजपे, मीनल परांजपे, राहुल परांजपे, नंदिता परांजपे, अनिकेत पराडकर, दामिनी हल्ली उपस्थित होते.

कला सोप्या पद्धतीने मांडावी
आजच्या कलाकारांनी सतत काहीतरी वेगळे करण्यावर भर द्यायला हवा. आपली कला सर्वांना समजेल, अशा सोप्या पद्धतीने मांडण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील असावे. साहिल यांच्याकडे ही कला उपजतच आहे. त्याने पुष्कळ जग बघितले आहे. त्यातून त्याच्या चित्रांचे एकत्रिकरण झाले असून ते या प्रदर्शनातून प्रकट होत आहे हे विशेष, असे रवी परांजपे यांनी यावेळी सांगितले.

विविध रंगछटा पाहण्याची संधी
दोर्‍याचा वापर करून साकारलेला घोडा, हत्ती, वाघ आदींच्या भावमुद्रा यांबरोबरच वॉटर कलरच्या माध्यमातून साकारलेली अनेक विविध व्यक्तीचित्रे, पक्षी, निसर्ग यांच्या रंगछटा पाहण्याचा वेगळा अनुभव या प्रदर्शनामध्ये कलाप्रेमींनी मिळू शकेल. साहिल परांजपे यांचे हे पहिलेच प्रदर्शन असून यामध्ये त्यांनी साकारलेल्या तब्बल 55 कलाकृती आपल्याला पाहता येणार आहेत.

कलाप्रेमींच्या प्रतिक्रियांबाबत उत्सुकता
माझी कला प्रथमच सर्वांसमोर येत असल्याने त्याचा मला आनंद असून कलाप्रेमींच्या प्रतिक्रियेविषयी उत्सुकताही आहे. थ्रेड आर्ट ही एक वेगळी कला असून त्याद्वारे माझे निरीक्षण मी सर्वांसमोर मांडत आहे. याचा मला आनंद आहे, अशी भावना साहिल परांजपे यांनी यावेळी व्यक्त केली.